धावती रिक्षा पेटली ;३ मुलांचा मृत्यू
नेवासा पोलीस ठाण्यात शफिक रफिक कुरेशी (रा. संजयनगर नं-५ औरंगाबाद) यांनी खबर दिली आहे. नेवासा तालुक्यातील चांदा येथील कुरेशी यांच्या नातेवाईकांचा सोमवारी संध्याकाळी साखरपुडा होता. त्यासाठी कुरेशी कुटुंबिय औरंगाबादहून चांदा येथे आले होते. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर रिक्षा (क्र. एम.एच.२०-ईएस ०७२२) मध्ये चालक समीर हनिफ कुरेशी, रफिक हाजिजाफर कुरेशी (वय ५५), जुनेद शाफिक कुरेशी (वय १३), नमिरा शाफिक कुरेशी (वय ८), महेविश आतिक कुरेशी (वय ७) (सर्व रा़ संजयनगर नं-५ औरंगाबाद) हे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादला जाण्यासाठी निघाले होते.
प्रवरसंगम जवळील पेट्रोल पंपासमोर त्यांची रिक्षा आली असताना रिक्षाने पेट घेतला. त्यामध्ये नमिरा शाफिक कुरेशी (वय ८), महेविश आतिक कुरेशी (वय ७) या दोन चिमुरड्यांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला. तर जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. यातील जुनेद शाफिक कुरेशी (वय १३) याची प्रकृती गंभीर होती. त्याचाही औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
