Breaking News

दोन गटातील वादात एकमेकांना पिस्तुलाने जीवे मारण्याचा प्रयत्न


पाथर्डी /प्रतिनिधी/- पाथर्डी पोलीस स्टेशनच्या अगदी थोड्या अंतरावर असलेल्या माणिकदौंडी चौक येथे गुरुवार,११जानेवारी च्या सकाळी दोन गटात झालेल्या वादात एकमेकांना पिस्तुलाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये या घटनेबाबत दोन वेगवेगळ्या फीर्यादी दाखल झाल्या. पहिल्या फीर्याद मध्ये सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्या पत्नी शालिनी आव्हाड या सकाळी सात वाजण्याच्या सुमारास माणिकदौंडी चौक येथे दुध विक्रीच्या दुकानावर दुध ग्राहकांना विकत होत्या. त्यावेळेस जांभळी गावचे माजी सरपंच विजय बाबुराव आव्हाड व विकास खेडकर व त्यांचे सोबत असलेले चार अनोळखी इसम पांढऱ्या रंगाच्या स्कोर्पिओ गाडीत बसून त्यांचा दुकानावर आले. किसन आव्हाड यांनी जांभळी गावातील रोजगार हमी योजनेच्या रोपवाटिका तसेच ग्रामपंचायती मधील आर्थिक गैरव्यवहाराबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आम्हाला त्रास देतो. त्यामुळे आमचा खूप खर्च झाला आहे, किसन आव्हाड कुठे आहे? त्याला जिवंत ठार मारतो. असे म्हणून विजय आव्हाड याने शालिनी आव्हाड यांच्या डोक्याला पिस्तुल लावून मारहाण करून शालिनी यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठन व नऊ हजार रक्कम पिस्तुलचा धाक दाखवून चोरून नेले. त्यावेळी विकास खेडकर याने त्याचे हातातील तलवारीने व इतर अनोळखी चार इसमांनी लोखंडी गजाने टेबल व दुधाच्या किटल्या तसेच रस्यावर जाणाऱ्या येणाऱ्या ट्रक व पिकअप वाहनाच्या काचा फोडल्या. शालिनी आव्हाड यांना पिस्तूलाने गोळ्या घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वी. कलम ३०७ तसेच हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर विजय आव्हाडनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सकाळी सात वाजता पेपर आणण्यासाठी जात असताना माणिकदौंडी चौकात भगवान आव्हाड, किसन आव्हाड, महादेव आव्हाड, पांडुरंग आव्हाड, सुहास मोरे यांनी सुमो गाडीत येऊन गाडी आडवी लावून आम्हाला आडवा चालतोस काय? असे म्हणून भगवान आव्हाड यांनी चॉपर्स ने विजय यांच्या मानेवर वार केला. परन्तु वार चुकल्याने चॉपरचा वार विजय यांच्या कानाला लागून जखमी झाले आहे. यावेळी किसन आव्हाड यांनी पिस्तूलाचा धाक दाखवला. तसेच जवळच दुध विक्री करत असलेले पांडुरंग व सुहास आव्हाड यांनी विजय यास पकडून रस्त्यावर पाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा भादवी कलम ३०७ व हत्यार कायद्या प्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.