Breaking News

‘करते उलटे सिधे काम, करते राम नाम बदनाम’ कुमार विश्वास यांची भाजपवर टीका.


सोनई प्रतिनिधी :- सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या व दुधाचे उत्पादन होणा-या या जिल्हयाकडे पाहता चहावाला पंतप्रधान मात्र येथील नाही, हे दिसते. रामरहिम, राधेमाॅ यांच्या सारख्यांमुळे संत क्षेत्र बदनाम होऊ लागले, हे सांगतांना ‘करते उलटे सिधे काम, करते राम का नाम बदनाम’ या अशा मार्मिक शब्दांत आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी कवितेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर टीका केली. येथील यशवंत सहकार सभागृहागात यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने ज्येष्ठ साहित्यिक, माजी खा. यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हिंदी कवि संमेलनात ते बोलत होते. यावेळी उपस्थित साहित्यिकांनी यशवंतराव गडाख यांचे पुस्तके भेट देऊन अभिष्टचिंतन केले. 
संमेलनाच्या शुभारंभी यशवंतराव गडाख यांचा जीवनप्रवास असलेल्या फोटो बायोग्राफीचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न झाला. व्यासपीठावर ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, यशवंतराव गडाख आणि कवि संमेलनास उपस्थित असलेले मान्यवर कविवर्य उपस्थित होते. व्यासपीठावरील फलकही लक्षवेधी होता. फुलांची आकर्षकरित्या करण्यात आलेली सजावट साहित्य रसिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. डाॅ. सुभाष देवढे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना बहारदार सूत्रसंचालन करत उपस्थितांची वाहवा मिळविली. यशवंतराव गडाख यांच्या ‘मेंटली अनफिट’ या मराठी कवितेचा डाॅ. सुभाष देवढे यांनी केलेला हिंदी अनुवाद काव्य रसिकांना अधिक भावला. संमेलनात सहभागी झालेल्या कवींनीही या हिंदी अनुवादाची भरभरून प्रशंसा केली. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे व्यासपीठावरील मान्यवरांना प्रशांत गडाख आणि संजीव तनपुरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास म्हणाले, की राळेगणसिध्दी माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. देशासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा एकत्र याल, तेव्हा तेव्हा मी आवर्जून येईल. हिंदी भाषा ही माझी मातृभाषा असली तरी मराठी भाषा ही माझी थोरली मावशी आहे. मी भारतीय राजकारणातील सर्वात कमी वयाचा अडवाणी आहे. महाराष्ट्र राज्य हे चेतना असणा-यांना स्फृर्ती देणारे आहे. संस्कृतच्या परंपरेतून संतांची भाषा येते. 

सुदिप भोला यांनी राजकारण हा आनंद घेण्याचा विषय असून मते कोणत्याही पक्षाला द्या. सरकार भाजपच बनवेल या वास्तवावर भाष्य करताच हास्याचे कारंजे फुलले. जीवन हसरे हवे, यासाठी सदैव आनंदी रहा, हे सांगतांना त्यांनी शाब्दिक चिमटे काढत कवी संमेलनात रंग भरला. 

दिनेश वाबरा म्हणाले, जनतेच्या मनात आदर असलेले नेते कमी आहेत. गडाख साहेबांना जनतेचे प्रेम मिळाले, हे आजच्या उपस्थितीने दाखवून दिले आहे, असे सांगताना टाळयांचा कडकडाट झाला. साखर खाण्यातील आनंद आजारपणाकडे घेऊन जातो, हे सांगताना शुगर फ्री राहण्याचा संदेश त्यांनी दिला. ‘नमो नमो के नारे, खुब हुए जयकारे, सारे मोदी के विरोधी मे मेल हो गया, उसके बाद भी मम्मी का पप्पू ..... ’ या काव्यपंक्तीवर अवघ्या सभागृहाने ठेका धरला होता. राहुल गांधी यांच्या लग्न होण्याच्या विषयावर ‘जिस कन्या को देखके राहुल का मन डोले .....’ या काव्य पंक्ती सादर केल्या जात असताना सात मजली हास्याचा गडगडाट झाला. भारत माता व वंदे मातरमच्या घोषणेने स्फृर्ती कशी मिळते, हे सांगताना शेतक-यांच्या आत्महत्या होण्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘तुटी माला जैसी बिखरी किस्मत किसान की ....’ ही भुमीपुत्राची वेदना मांडणारी कविता ऐकताना अवघे सभागृह स्तब्ध झाले होते. ‘किसी को काले धन की चिंता, किसी को भ्रष्टाचार की चिंता’ या कवितेतून त्यांनी कोण कशाच्या चिंतेत असतो, हे नेमकेपणाने सांगितले. 

कविता तिवारी यांनी काव्य रचना सादर करताना सर्वांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडत सामाजिक परिस्थितीवर आसूड ओढले. शहिद होणा-यांमुळेच आपला हिंदुस्थान जिवंत राहिला हे सांगताना त्यांनी शहिदांच्या कार्याला सलाम केला. ‘अगर दुष्मन हो सन्मुख तो जवानी जाग जाएगी, जो सोयी है पराक्रम की कहाणी जाग जाएगी’ या गिताने इतिहासाच्या स्मृतींना उजाळा दिला. आंदोलनांचा शंखनाद झालेल्या भुमीचे कौतुक करताना कविता तिवारी हिने मुलीच्या जन्माचे महत्व वर्णन केले. देश वाचविण्यासाठी मुली वाचवणे गरजेचे आहे. 

कुमार विश्वास यांनी रिसायकलींग, मदर्स डे, फादर्स डे, पिझ्झा, बर्गर, ताण तणाव, एकटेपण यावर नेमकेपणाने बोट ठेवत केलेली मिश्किल विनोद निर्मीती टाळयांची दाद घेवून गेली. ‘हमने दुनिया मे मोहब्बत का असर जिंदा किया है, दुश्मन को गले मिल शरमिंदा किया है’ या काव्य पंक्ती आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनोख्या कार्य शैलीचे कौतुक केले. विश्वामध्ये हिंदुस्थानने केलेल्या चमत्कारांवर त्यांनी केलेल्या शब्दांच्या कोटयांना दाद दिली जात असताना अवघ्या सभागृहात टाळ्यांचा अक्षरशः पाऊसच पडला. त्यातच कवी संमेलनाची संागता झाली.

यशवंतराव गडाख यांच्या जन्मोत्सवात सर्व आनंदाने सहभागी झाले, हे त्यांच्या पुण्यफलाचे प्रतिक आहे, असे सांगताना नम्रता व शालिनता हे जीवनाचे सार हे यशवंतरावांकडून प्रशांत गडाख यांना मिळाले आहेत, असे कवींनी म्हटले. तेव्हा पाहुण्यांनी नेमकेपणाने मांडलेले मत सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले. नगर शहरात झालेले हे हिंदी कवी संमेलन काव्यरसिकांना तृप्त करणारे ठरले. संगिताविना भाषेचा होणारा चमत्कार आणि मिळणारा आनंद उपस्थितांनी अनुभवला. उत्तम नियोजन, व्यवस्था लक्षवेधी ठरले.