Breaking News

अमृतनगरीतील खाद्यमहोत्सवात खवय्यांची चंगळ!


सोनई प्रतिनिधी :- येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या अमृतनगरीतील खाद्य महोत्सवात खवय्यांची चांगलीच चंगळ झाली. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अनुभव घेत अविट गोडीच्या विविध पदार्थांवर सहकुटुंब ताव मारताना हजारो खवय्यांनी खाण्यातील आनंद लुटला. 
शाकाहारी खाणा-यांसाठी खान्देशी पदार्थातील शेवभाजी, वांगभरीत, कढी खिचडी, व-हाडी पदार्थातील आलु वांग भरीत, पातळ भाजी, गोळा भात, झुणका भाकर, जिलेबी, कोकणी पध्दतीचे मिसळीचे आंबट, गोड वरण, सोलकढी, आलु सुक्की भाजी, मालवणी भागातील काळया वटाण्याची उसळ, फणसाची भाजी, शेवयाची खिर, नागपूरी सावजी म्हणून ओळख असलेला पाटवडी रस्सा, बुंदी रायता तसेच व्हेज कोल्हापूरी हे वेगवेगळया स्वादाचे पदार्थ खाताना त्या त्या भागातील चव जिभेवर रेंगाळत असल्याचे खवय्ये अनुभवत होते. चाटचे स्टाॅलही हाऊसफुल्ल झाले होते. आलु टिक्की, रगडा पॅटीस, पाणीपुरी, पपडी चाट, दहीशेवपुरी या पदार्थांची गोडी चाखण्यासाठी युवक - युवतींनी चांगलीच गर्दी केली.