महाराष्ट्र योग सोसायटीतर्फे खुली योगासन स्पर्धा
दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतो. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वामी रामदेवजी महाराज तसेच अन्य योगऋषींनी केलेल्या कार्याचा मोठा वाटा आहे. योगामध्ये सर्वसामान्य नागरिकांना रुची निर्माण व्हावी याकरिता केल्या जाणा-या प्रयत्नांचा एक भाग म्हणून योग सोसायटी महाराष्ट्रद्वारे खुली योग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा, विभाग व राज्य अशा त्रिस्तरीय स्पर्धेसाठी पतंजली योग समितीने पुढाकार घेतला असून अन्य संघटनांच्या साह्याने आयोजन केले आहे. रत्नागिरी जिल्ह्याची फेरी 28 जानेवारीला जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहाच्या सभागृहात होणार आहे. या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेत रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर तालुक्यातील स्पर्धकांसाठी स्पर्धा होईल. उर्वरित तालुक्यांसाठी सकाळी 11ते दुपारी 1 या वेळेत व स्पर्धकांची संख्या जास्त असल्यास दुपारी 2 ते 6 या वेळेत स्पर्धा होईल. नावनोंदणीची अं तिम तारीख 23 जानेवारी आहे. दहा ते 15 वर्षे, 16 ते 25 वर्षे आणि 26 च्या पुढील वयोगट अशा महिला, पुरुषांच्या सहा गटांत स्पर्धा होईल. वय वर्षे 10 ते 15 गटासाठी वृक्षासन, पश्चिमोत्तानासन, द्विपाद शलभासन, बकासन, सर्वांगासन व ऐच्छिक आसन अशी सहा आसने करायची आहेत. वय वर्षे 16 ते 25 वर्षे गटासाठी पादहस्तासन, अर्धमच्छिन्द्रासन, धनुरासन, बकासन, हलासन व कोणतेही 1 ऐच्छिक अशी सहा आसने करायची आहेत.
