Breaking News

अग्रलेख - बहुजन समाज झुंजविण्यातच सत्ताधार्‍यांना रस

भीमा कोरेगाव येथील आंबेडकरी अनुयांयावर अमानुषपणे दगडफेक करण्यात आली, त्यांच्या गाडया फोडण्यात आल्या, मात्र गुन्हे नोंदवण्यात मात्र टाळाटाळ करण्यात आली. मात्र या घटनेचे पडसाद दुसर्‍या दिवशी व तिसर्‍या दिवशी महाराष्ट्र बंद च्या स्वरूपात उमटल्यानंतर मात्र राजकीय विषारी वक्तव्ये सुरू झालीत. आपल्या अनुयांयावर झालेल्या हल्ल्याचा उद्रेक होणे साहजिक आणि स्वाभाविक होते. जर प्रशासन आणि सरकारने वेळीच हल्लेखोरांना पकडले असते, तर कदाचित महाराष्ट्र बंदची हाक देण्याची वेळ अजिबात आली नसती. 

मात्र आपल्या राजकीय स्वार्थांसाटी प्रशासनांचा वापर करणार्‍यांनी याहीवेळी वातावरण कसे तापेल याचीच दक्षता घेतली. वास्तविक भीमा कोरेगाव येथे दरवर्षी आंबेडकरी अनुयांयी विजयस्तभांना मानवंदना देण्यासाठी येत असतांना कधी असा दंगलीचा प्रसंग, दगडफेकीचा, जाळपोळीचा प्रसंग उद्भभवला नाही. नेमका याचवर्षी तो का उद्भभवला, याचा शोध सरकारने घेण्याची गरज आहे. शिवसेनेला आता आपल्याच पार्श्‍वभूमीचा विसर पडला आहे. त्यामुळेच त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका करतांना म्हटले आहे, प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये, असा सल्ला सेनेने दिला आहे. 

त्याचबरोबर राज्यात ठिकठिकाणी हिंसाचार उसळलेला असताना सरकारची भूमिका काय असा सवाल उपस्थित करत भाजपवरही निशाणा साधला. वास्तविक महाराष्ट्रात जातीय हिंसाचार घडवण्यामागे नेमका कोणाचा हात होता, याचा इतिहास महाराष्ट्राला ज्ञात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी बंदची हाक दिल्यानंतर संपूर्ण समाज रस्त्यावर उतरल्यामुळे प्रतिगामी शक्तींची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच जातीय हिंसाचार महाराष्ट्राबाहेरील लोक येऊन पसरवत आहेत, असे मुख्यमंत्र्याचे विधान देखील त्यांची दृष्टी, आणि पार्श्‍वभूमी दर्शवत आहे. त्यामुळेच छात्र भारती संघटनेच्या संमेलनाला उपस्थित राहणार्‍या जिग्नेष मेवाणी आणि उमर खालिद यांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आली. गुजरात निवडणूकांमध्ये उना प्रक रणानंतर समोर आलेला, जिग्नेष मेवाणी हाच तो तरूण. जो दलितांच्या न्याय हक्कांसासाठी आक्रमकपणे आपली बाजू मांडत होता. गुजरातमध्ये त्याच्या आक्रमकपणामुळे जातीय दंगली पेटल्याचे कधी दिसत नाही. मग महाराष्ट्रातच जिग्नेष मेवाणी असा काय विखारी बोलला, ज्यामुळे त्याच्याविरोधात सर्च आऊ टची नोटीस जारी करण्यात येते. ऐनवेळी पोलिसांकडून या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. 

त्यामुळे छात्र भारतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच, असा निर्धार छात्र भारतीने व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्या भाईदास सभागृहाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे या परिसराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. काही वेळापूर्वीच पोलिसांकडून काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना परिसरातून हटवण्यात आले आहे. गुजरातमध्ये जिग्नेष मेवाणी सत्ताधार्‍यांना एक तोफ वाटतो, ज्यामुळे त्याचे खच्चीक रण करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले जातात, तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील शनिवार वाडयावरील त्याचे भाषण झाल्यानंतर त्याची धास्ती घेऊन, त्याच्यावर छात्रभारतीच्या कार्यक्रमावर बंदी लादण्यात येते. वास्तविक दगडफेक, जाळपोळ ही दोन समाजात दुही पसरवण्यासाठी मांडलेली खेळी होती, त्यात प्र तिगामी शक्ती यशस्वी होतांना दिसून येत आहे. तर बहूजन समाज मात्र आपआपसात झुंजतांना दिसून येत आहे.