Breaking News

भारतीय प्रशासन सेवेत सामिल होण्याचा ध्यास बाळगावा ः सोनी

मारवाडी समाजातील युवक-युवतींनी भारतीय प्रशासन सेवेत रुजू होण्याचा ध्यास घेवून देश व समाजाच्या जडणघडणीत योगदान देणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीकरिता, अखिल भारतीय माहेश्‍वरी महासभेच्या माध्यमातून देशपातळीवर प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले असून प्रज्ञावंतांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर सोनी यांनी केले.


अखिल भारतीय माहेश्‍वरी महासभेच्या संघटन आपके द्वार पर या उपक्रमांतर्गत शेवगाव येथील मारवाडी गल्लीतील बालाजी मंदिराच्या सभागृहात संघटनेतील पदाधिका-यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समाजबांधवांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपिठावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मधुसुदन गांधी, जिल्हाध्यक्ष विठ्ठलदास आसावा, उपाध्यक्ष गणेश बाहेती, रामबिलास बूब, सचिव अजय जाजू, महिला जिल्हाध्यक्षा मंजुश्री धूत उपस्थित होत्या. सोनी पुढे म्हणाले की, माहेश्‍वरी समाज हा उपजतच प्रज्ञावंत आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत नसल्याने स्पर्धेच्या युगात ते टिकाव धरु शकत नाहीत हे वास्तव आहे. त्याकरिता समाज धुरिणांनी समाजातील माध्यमिक शिक्षण घेणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी प्रोत्साहित करावे. समाजबांधवांच्या आर्थिक सहभागातून करोलबाग-नवी दिल्ली येथे अशा विद्यार्थ्यांसाठी खास प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. माहेश्‍वरी महासभेच्या माध्यमातून देशात ठिकठिकाणी विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी वसतीगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. देशात हजारों गावांत समाजाच्या मालकीचे भवन, समाजमंदिरे, सभागृहे व अन्य इमारती उभ्या आहेत. या वास्तुंचा उपयोग समाजातील युवाशक्तींसाठी शैक्षणिक व संस्कार शिबिरे, तरुणींसाठी संगणक प्रशिक्षण केंद्रे व माता-भगिनींकरिता आध्यात्मिक उपक्रमांसाठी होणे आवश्यक आहे.