Breaking News

आभासी वैद्यकीय पदव्यांमुळे रुग्णांची दिशाभूल! अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले डॉक्टर झालेत तज्ज्ञ


संगमनेर/प्रतिनिधी ;- शहर आणि तालूका परिसरात काही वर्षात नवनवीन डॉक्टर्स येऊन आपला वैद्यकीय सराव करत आहेत. यात बहुतांश डॉक्टरांच्या पदव्या या एमडी, एमएस अशा आहेत. त्यामुळे रुग्णांची दिशाभूल होताना दिसते. मुळात अशा वैद्यकीय सराव करणाऱ्या डॉक्टरांना कायद्यानुसार या पदव्या कोणत्या शाखेच्या म्हणजेच ऍलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आहेत, हे लिहिणे अनिवार्य आहे. परंतु असे न करता या पदव्यांच्या शाखेचा उल्लेख फक्त त्यांच्या पदवी प्रमाणपत्रापुरताच मर्यादित असल्याचे दिसत आहे. शहरातील डॉक्टर्स राजरोसपणे आपल्या नावासमोर या पदव्या लिहून अमुक ‘तज्ज्ञ’ तमुक ‘तज्ज्ञ’ असा उल्लेख करतात. सामान्य नागरिक मात्र यासर्व बाबींचा खोलात जाऊन विचार न करता आपला आजार बरा व्हावा, या अपेक्षेने या डॉक्टरांकडे जातात. परंतु या सर्वांतून रुग्णांच्या समस्यांचे निराकरण न होता, त्यांचे खिसे मात्र रिकामे होत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक आणि मेडिकल कौन्सिल ऑफ या इंडिया या संस्थांनी या ‘मुन्नाभाईं’वर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.