Breaking News

पोलिस स्थापना सप्ताहात पारधी समाजातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन.


कोपरगाव ता. प्रतिनिधी - जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम साजरे होत आहेत. कोपरगाव तालुक्यातीदेखील पारधी समाजातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करुन आगळावेगळ्या पध्दतीने पोलिस स्थापना दिवस साजरा करण्यात आला. पोलिस निरीक्षक साहेबराव कडणोर यांच्या मार्गदर्शनाखाली पढेगाव येथे यानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
तालुक्यातील पढेगाव येथे जिल्हा परिषद व न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात शिक्षणाचे धडे गिरविणा-या पारधी समाजातील विद्यार्थ्यांना पोलिस उपनिरीक्षक सिद्धार्थ अहिरे, सहाय्यक उपनिरीक्षक आर. के. धिवर, ठाणे अंमलदार भदाणे, अशोक कुसाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल माहिती जाणून घेतली. या मुलांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उपस्थित पालकांचेही प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन गुणवत्ता मिळवावी, असे सांगून भविष्यात पोलिस दलात असलेल्या नोकरीच्या संधीबद्दल सविस्तर माहिती दिली. सहाय्यक उपनिरीक्षक एस. पी. पवार यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आधुनिक शस्त्रांची ओळख दिली. प्रात्यक्षिकदेखील करुन दाखविले. यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रे जवळून पाहण्याची व हाताळण्याची संधी मिळाली. कोपरगाव पोलिसांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरला. विद्यालयातील हे विद्यार्थी अभ्यासाच्या व गुणवत्तेच्या जोरावर देशाच्या कार्यात नक्कीच योगदान देतील, अशी ग्वाही विद्यालयाचे शिक्षक अशोक गायकवाड यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषद व न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील विद्यार्थी पालकांसह कासलीचे लक्ष्मण मलिक व सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. शिक्षक बाळासाहेब साबळे यांनी आभार मानले.