स्वातंत्र्यसैनिक स्व. भाऊसाहेब थोरात सहकारातील संत : पवार
ते म्हणाले, की अवघ्या १९ व्या वर्षी स्व. थोरातांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. १९४२ च्या आंदोलनातील ब्रिटीशांविरुध्दाच्या कारवायांमुळे त्यांना १५ महिने तुरुंगवास झाला. मात्र या काळात डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा सहवास व त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव भाऊसाहेबांवर पडला. १९४३ मध्ये सुटका झाल्यानंतर त्याच विचारांनी प्रेरित झालेल्या भाऊसाहेबांनी महात्मा गांधींची ग्रामीण विकासाची संकल्पना घेऊन समाज विकासाचे कार्य सुरु केले.
गोरगरिब, शेतकरी यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शेतकर्यांना त्यांनी संघटीत केले. त्यांच्यासाठी विविध मोर्चे, आंदोलने केली. सोसायटीचे अध्यक्षपद ते राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद हा त्यांचा सहकारातील प्रवास सर्वसामान्यांच्या उध्दाराचा राजमार्ग ठरला. त्याच काळात सरकारला सहकारात भाऊसाहेंबामुळे एक कायदाही पास करावा लागला. स्वातंत्र्यानंतर शेतकर्यांसाठी त्यांनी सहकाराचा मार्ग निवडला. स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या विचारातून काम करतांना त्यांनी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. दुष्काळी भागात व अत्यंत माळरानावर प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेला हा कारखाना सहकारी कारखानदारीसाठी दिपस्तंभ ठरला. कमी प्रर्जन्यमान, सरकारी धोरणांचे अडथळे, आर्थिक अडचणी असतांनादेखील भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीच्या आराखड्यातून उभा राहिलेला हा कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरला. ८०० मे. टन ते ५हजार ५०० मेट्रिक टन क्षमता अशी दमदार वाटचाल करणार्या या कारखान्याने केली. शेतकरी व ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास जपतांना कायम उच्चांकी भाव दिला आहे. भाऊसाहेबांची आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर व आधुनिकता ही चतु:सूत्री अनेकांना मार्गदर्शक ठरली आहे. त्यांच्या ग्रामीण विकासाच्या पायाभूत आराखड्याची अनेक वेळा शासनानेही दखल घेत तशी अंमलबजावणी केली आहे.
आयुष्यभर समाज घडविण्यांचे काम त्यांनी केले. सध्या विज्ञानवादाने माणूस विकसित झाला की बिघडला, हा मोठा चिंतनाचा विषय आहे. परंतू अखंडपणे जिल्हा बँक, राज्य बँक, सहकाराचे नेतृत्व करतांना भाऊसाहेबांच्या स्वच्छ नेतृत्वावर कधीही डाग लागला नाही. त्यांच्या संपूर्ण जीवनकार्यातील विविध टप्प्यांवर सामाजिक, शेती, पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास अशा क्षेत्रात अलौकिक भरीव कामगिरी केली. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये राबविलेल्या तत्वांचा शोध घेवून त्याआधारे वाटचाल करणे गरजेचे आहे. अशा पुरुषांचा विचार हा जीवनाला ऊर्जा देवून जातो. विचारवंत बाळासाहेब भारदे म्हणायचे, शासनाचे कार्यक्रम विकासासाठी राबविले पाहिजे. स्व. भाऊसाहेबांनी मात्र कायम समाजविकासाचे कार्यक्रम राबविले. त्यांची अंमलबजावणी केली. त्यातून तालुक्यातील जनतेचा आर्थिक स्तर विकसित केला.
