Breaking News

शिक्षणसंस्थांची संख्या वाढली मात्र गुणवत्ता नाही - प्रा. जी. रघुराम

पुणे, दि. 12, जानेवारी - उच्च शिक्षण देणा-या संस्थांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. परंतु गुणवत्तेचा मात्र अभावच आढळून येत आहेे. आयआयटी, आयआयएमसारख्या अनेक संस्थांना पूर्णवेळ संचालक नाही. त्यामुळे उच्च शिक्षणाचा गवगवा होत असून, प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणात आपण अपयशी ठरलो आहोत, असे मत बंगळुरु येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा. जी. रघुराम यांनी केले.

एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसर्या नॅशनल टीचर्स काँग्रेसमधील तिसर्या चर्चासत्रात ’उच्च शिक्षणातील गुणवत्ता: सत्य की सामोपचार’ या विषयावर प्रा. जी. रघुराम बोलत होते.


प्रा. जी. रघुराम म्हणाले, आज 18 पैकी 15 आयआयटी, 20 पैकी 11 आयआयएम, 31 पैकी 12 एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांना पूर्णवेळ नेतृत्व देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. अशावेळी उच्च शिक्षणात आम्ही पुढे आहोत हे म्हणणे धाडसाचे ठरेल. या सगळ्यावर मात करून गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण द्यायचे असेल, तर या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवावी लागेल. केवळ खासगी शिक्षण संस्था वाढवून चालणार नाही. अध्यापन आणि संशोधन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेतले पा हिजे. आंतरशाखीय अभ्यासाबरोबरच नवनिर्मिती आणि समस्या सोडविण्याचे उपाय यावर विचार व्हावा.