Breaking News

स्व निधीतून साकारतोय आकर्षक जांभा दगडी बस थांबा


डोंबिवली, दि. 21, जानेवारी - नागरिकांच्या समस्या जाणून स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्य करीत असतात. परंतु अशा प्रकारची कामे करतांना कलात्मक दर्जा आणि लक्षवेधी सुबकता दाखवून विकास कामे करणारे फार कमीच असतात. पण औद्योगिक विभागात नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील यांनी अनोखी पद्धत आणि स्व निधीतून निर्मिती केलेला आकर्षक जांभा दगडी बस थांबा डोंबिवलीकारांचे लक्ष वेधून घेत आहे.
पूर्वेकडील औद्योगिक विभागातील निवासी भाग, एमआयडीसी येथे शिवसेनेच्या नगरसेविका प्रमिला मुकेश पाटील (प्रभाग क्र.110 सोनारपाडा) यांनी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या बससाठी या आगळ्या-वेगळ्या थांब्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबाच्या जयंतीचे औचित्य साधून त्या बस थांब्याचे लोकार्पण होणार आहे.
निवासी भागातून सकाळ ते रात्री प्रवाशांची लगबग सुरु असते. रिक्षा व परिवहन बसची सोय येथे आहे. परिवहन बसची सोय नियमित आहे. निवासी भागात जेथे बस टर्मिनल आहे. जेथून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. तेथे बर्‍यापैकी बस थांबा नव्हता. मात्र सोनारपाड्याचे माजी सरपंच मुकेश पाटील व त्यांच्या पत्नी नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या स्वनिधीतून बस थांब्याची निर्मिती केली आहे. वैशिष्ट्य म्हणजे बस थांब्यासाठी दापोली (रत्नागिरी) येथून आणलेला लाल जांभा दगड, उडन लादी, उडन सिलिंग, नंबरप्लेटसाठी दिवा, डाव्या-उजव्या बाजूला झाडे आणि कोपर्‍यावर दोन भव्य दिवे असा प्रवाशांचा लक्ष वेधून घेणारा अनोखा बस थांबा भविष्यात निश्‍चित डोंबिवलीकरांचा सेल्फी पाँइंट होईल असे निदर्शांत येत आहे. जांभ्या चिर्‍याचा लाल रंग व खडबडीतपणा कोकणच्या अस्सल रंग-गंधाची आठवण करून देतो. या थांब्याची रचना देखील ऐसपैस आहे. जांभ्यामुळे उन्हाळ्यात कायम थंडावा असेल, असे मुकेश पाटील म्हणाले.