Breaking News

‘जलयुक्त शिवार ’ अभियानातील उत्कृष्ट कार्यासाठीच्या जलमित्र पुरस्कारांचे गुरुवारी वितरण


मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार तसेच इतर विविध पुरस्कारांचे वितरण गुरुवार, दि. 4 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व मृद व जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सायंकाळी 3.30 वा. हा कार्यक्रम होणार आहे.
सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सन 2015-16 या वर्षात या योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ती, संस्था, अधिकारी व पत्रकारांना महात्मा जोतिबा फुले जलमित्र पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. या पुरस्कार विजेत्यांना गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत,आमदार राज पुरोहित, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरावर महात्मा जोतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार व जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार देण्यात येणार आहेत.

जलमित्र पुरस्कार विजेत्यांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. राज्यस्तरावरील महात्मा जोतिबा फुले जलमित्र प्रथम पुरस्कार मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर), द्वितीय क्रमांक वेळू (ता.कोरेगाव, जि. सातारा), कर्जत (ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना जाहीर झाले आहेत. तर राज्यस्तरावरील तालुका संवर्गामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यास प्रथम, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यास द्वितीय तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड जिल्ह्यास द्वितीय पुरस्कार जाहिर झाले आहे. तर जिल्हा प्रवर्गामध्ये सोलापूर जिल्ह्यास प्रथम तर पुणे व अहमदनगर जिल्ह्यात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाले आहेत.