Breaking News

अर्थसंकल्पात तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न होणार करमुक्त

नवी दिल्ली : केंद्र सरकार येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार असून, या अर्थसंकल्पात मध्यमवर्गींयाना दिलासा देत, त्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून होवू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकार निम्न मध्यमवर्गीयांना एक मोठी खुशखबर देऊ शकते. 


आयकर मुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांवरून 3 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मोदी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली घेऊ शकतात. येत्या 1 फेब्रुवारीला यासंबधीचा निर्णय झाला तर 3 लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना आयकर भरावा लागणार नाही. 2019च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यासंबंधीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या वर्षीच्या बजेटमध्येही सरकारने 2.5 ते 5 लाखांपर्यंतच्या स्लॅबसाठीचा आयकर 10 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणला होता. 

त्याचा मध्यमवर्गीयांना मोठा फायदा झाला होता. त्याच धर्तीवर यावर्षी तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले जाऊ शकते. एवढेच नाहीतर टॅक्सस्लॅबही वाढवले जाऊ शकतात. अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर नीती आयोगाची बैठक होत आहे. या बैठकीला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. वर्ष 2018-19 चे बजेट हे मोदी सरकारच्या कार्यकाळाचे शेवटचे पूर्ण बजेट असेल. या बजेटमध्ये सरकार मध्यमवर्गाला दिलासा देण्याची शक्यता आहे.