ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५८ लाख मंजुरी
नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी होत्या. रुग्णालय परिसर व वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने रुग्णालयाच्या उद्घाटनापासून पुन्हा दुरुस्त अथवा डागडूजी केलेली नव्हती. परिणामी या ठिकाणी निवासस्थानांमध्ये कोणताही वैद्यकीय अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून रहात नव्हते.
जे कर्मचारी अथवा वैद्यकीय अधिकारी तात्पुरत्या स्वरुपात रहात होते त्यांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागत असे. पावसाळ्यात तर ही निवासस्थाने राहण्या योग्यच राहिलेली नव्हती. याशिवाय निवासस्थानामधील शौचालय हा मोठा गंभीर विषय झाला होता. याशिवाय ग्रामीण रुग्णालय देखील परिसर स्वच्छतेअभावी नेहमीच टीकेचा विषय झालेले होते. वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालय दोन्हीही ठीकठाक नसल्याने रुग्णांना चांगली सेवा मिळू शकत नसे व आलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी नगर अथवा औरंगाबादला हलवाण्याचेच आदेश द्यावे लागत असत. कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर साधन सामुग्रीचा अभाव होता.
नागरिक व अधिकाऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ग्रामीण रुग्णालयाची संपूर्ण माहिती घेऊन दुरुस्तीचा आराखडा तयार करून घेतला व १ कोटी ९२ लाख रक्कमेचे अंदाज पत्रक सादर केले होते. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य सेवा संचालयाने या आराखड्याबाबत अहवाल मंत्र्यांकडे पाठवला. आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी सदर आराखड्यास मंजुरी दिली. त्यानुसार १ कोटी ५८ लाख ३२ हजार एवढ्या रक्कमेचे अंदाज पत्रकास व आराखड्यास शासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदरचे काम ताबडतोब सुरु करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचेही आमदार बाळसाहेब मुरकुटे यांनी सांगितले.
