Breaking News

कबड्डी स्पर्धेत जैतिर तुळसला विजेतेपद

सिंधुदुर्गनगरी, - नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आयोजित वेंगुर्ला तालुकास्तरीय स्तरीय कबड्डी स्पर्धेत चुरशीच्या अंतिम सामन्यात जैतिर तुळस संघाने संघर्ष कोचरा संघावर मात करत विजेतेपद पटकावले.


तुळस येथे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या सहकार्याने आणि वेंगुर्ला तालुका असोसिएशनच्या मान्यतेने नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत तुळसचे नवनिर्वाचित सरपंच शंकर घारे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ देेऊन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विद्यमान सरपंच भाग्यलक्ष्मी घारे, उपसरपंच संदीप पेडणेकर, सदस्य जयवंत तुळसकर, नेहरू युवा केंद्राच्या तालुका समन्वयक प्रज्ञा धाकोरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर, उपाध्यक्ष विवेक तिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वेंगुर्ले तालुक्यातल्या 18 नामवंत संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात पराभव स्वीकारत संघर्ष कोचरा संघास उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले तर ओंकार आडारी संघ आणि सातेरी स्पोर्ट्स वेंगुर्ला संघांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळविण्यात यश आले. वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघर्ष कोचरा सघाचा गोविंद नरे याने अष्टपैलू खेळाडूचा मान पटकावला. भक्तीयश साळगावकर(ओंकार आडारी संघ) उत्कृष्ट चढाई आणि महेंद्र तुळसकर(जैतिर तुळस संघ) उत्कृष्ट पकड बक्षिसाचे मानकरी ठरले.
उद्घाटन प्रसंगी झालेल्या तालुक्यातील महिला संघाचा प्रदर्शनीय सामन्याने उपस्थित हजारो प्रेक्षकांची वाहवा मिळवली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू घडण्यास सुरुवात होते आणि नेहरू युवा केंद्राच्या सहकार्याने वेताळ प्रतिष्ठान विविध क्रीडास्पर्धाचे आयोजन करत असून त्याचे सर्वच उपक्रम आहेत, असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच शंकर घारे यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.