Breaking News

अर्थसंकल्पात इंधनावरील एक्साईज डयूटी होणार कमी

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत असून, त्याचा फटका देशभरातील नागरिकांना बसत आहे. राज्यात देखील पेट्रोलच्या दरांने 80 रूपयांचा टप्पा गाठल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता असतांना, केंद्र सरकार या सर्वांना दिलासा देण्याची शक्यता असून, येत्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज डयूटी कमी होण्याची शक्यता कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी भडका घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून एक्साईज ड्युटी कमी केली जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 19 रुपये 48 पैसे, तर डिझेलवर 15 रुपये 33 पैसे एक्साईज ड्युटी आकारली जाते. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने दोन रुपये एक्साईज ड्युटी कमी केली होती. मात्र तरीही पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. राज्याची उपराजधानी नागपुरात पेट्रोलने 80 रुपये प्रती लिटरचा टप्पा ओलांडला आहे. नागपुरातील पेट्रोलचे आजचे दर 80.73 रुपये प्रती लिटर आहेत. तर डिझेल 67 रुपये 83 पैसे प्रती लिटर आहे. दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत असल्याने ही वाढ लक्षात येत नाही. मात्र गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑगस्ट 2014 नंतर प्रथमच इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा परिणाम निश्‍चितच महागाई वाढण्यासाठी होत असल्यामुळे सर्वसामान्यांना पुढील काही दिवसांत महागाईचा फटका बसू शकतो. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात ही प्रचंड दरवाढ झालेली दिसून येते आहे. या दरवाढीमुळे सामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार हे अटळ आहे.