Breaking News

मुंबई साबां अपहार प्रकरणी सत्य अहवाल देण्याचे आवाहन

आ. वाघमारे- चामलवार भेटीने चर्चेला उधाण पाच आर्थिक वर्षातील कामांची होणार फेरतपासणी


मुंबई/विशेष प्रतिनिधी : शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार निवासातील विधीमंडळ सदस्यांच्या कक्षांत दुरूस्तीचे काम करतांना केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून सत्य अहवाल सादर करा अशी आवाहनवजा सुचना आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांना केली आहे. दरम्यान सन 2012 ते सन 2017 या आर्थिक वर्षात शहर इलाखा विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी केलेल्या सर्व प्रकारचे कामांचा लेखाजोखाविषयी चर्चाही उभयतांमध्ये झाल्याचे वृत्त असल्याने पडद्याआड जाऊ पाहणारा भ्रष्टाचारही मनोराच्या निमित्ताने पुन्हा उघड होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई साबां शहर इलाखा विभागाच्या अंतर्गत मनोरा आमदार निवास कक्षांत सन 2015 -2017 या आर्थिक वर्षात झालेली देखभाल दुरूस्तीच्या कामात झालेला गोंधळ महाराष्ट्र साबांच्या इभ्रतीचे बाभाडे काढीत आहेत. कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या कार्यकाळात आमदारांच्या कक्षात बोगस, विना मंजूरी कामे झाल्याचा ठपका असून त्याची चौकशी मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार करीत आहे. प्रज्ञा वाळके यांचे साबां मंत्रालय ते प्रशासन दरम्यान असलेले हितसंबधामुळे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्यावर चौकशी संदर्भात दबाव असल्याची चर्चा साबांत आहे. या पार्श्‍वभुमीवर आज मंगळवार दि. 23 जानेवारी रोजी या प्रकरणाचे तक्रारदार भाजपाचे आ.चरणभाऊ वाघमारे आणि चौकशी करणार्‍या दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांची झालेली भेट महत्वाची मानली जात आहे.

आ. चरणभाऊ वाघमारे यांनी या भेटी दरम्यान आजपर्यंत झालेल्या चौकशीची माहिती घेऊन धनंजय चामलवार यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान आ. वाघमारे यांनी चामलवार यांना निष्पक्षपाती चौकशी करा अशी सुचना केली. प्रज्ञा वाळकेकृत यांच्या विद्यमान अपहार प्रकरणावरच चर्चा झाली असे नाही तर उभयंतांच्या चर्चेत सन 2012-13, 2013-14(किशोर पाटील), 2014-15(सीपी पाटील-रणजीत हांडे), 2015-16(प्रज्ञा वाळके), 2016-17 (प्रज्ञा वाळके) या आर्थिक वर्षातील कामा संदर्भातही चर्चा झाली. या आर्थिक वर्षांमध्ये झालेल्या कामांवर एकूण किती खर्च झाला, त्याच्या उपलब्ध रेकार्डचे ऑडीट आयआयटी व्हीएनआयटी सरकारी लेखापरिक्षण यंत्रणेकडून तपासणी करण्याबाबत आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुद्दा उपस्थित केला.

शहर इलाखा विभागातील आमदार निवास कक्ष अपहार प्रकरणी चौकशी करतांना आमदार कक्षांत काम करण्याबाबत संबंधित आमदारांचे मागणीपत्र कार्यकारी अभियंत्यांनी जोडले आहे का? एका कक्षात काम करण्याऐवजी दुसर्‍या कक्षात काम करण्याचा निर्णय घेतांना कार्यकारी अभियंत्यांनी आमदारांचे सुचनापत्र जोडले आहे का? या आमदार पत्राला अधिक्षक अभियंत्यांची परवानगी घेतली का? या कामासाठी वेगळे अंदाजपत्रक नव्याने तयार करून कार्यकारी अभियंत्यांनी त्या अंदाजपत्रकाला मंजूरी घेतली का? शहर इलाखा विभागाचे आवक रजिस्टर जप्त केले का? या सारखे मुद्दे आ.चरणभाऊ वाघमारे यांनी धनंजय चामलवार यांचेशी झालेल्या चर्चे दरम्यान उपस्थित केले. यावर आपण शहर इलाखा विभागाला या बाबत सहा पञे दिल्याचे स्पष्ट केले.
शहर इलाखाच्या कारभाराबाबत आ.चरणभाऊ वाघमारे हे गंभीर असून विद्यमान मनोरा आमदार निवास अपहारासोबत सन 2012 पासूनचे सर्व कामांचा फेरतपास करण्याबाबतही ते आग्रही असल्याने विस्मरणात टाकले गेलेल्या अनेक भ्रष्ट प्रकरणांना वाचा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.