Breaking News

माघी वारीसाठीची नियोजन बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 12, जानेवारी - सिंधू-पाऊले चालती, पंढरीची वाट, या योजनेअंतर्गत माघी वारी वारकरी यांची बैठक सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झाली. या बैठकीत माघी वारीविषयी नियोजन करण्यात आले.जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांच्या दालनात ही बैठक पार पडली. यावेळी आंबोली आणि वैभववाडी घाटमार्गे पायी वारी चालणार्‍या वारकर्‍यांच्या सेवेसाठी सिंधू-पाऊले चालती, पंढरीची वाट, या योजनेअंतर्गत दोन रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आवश्यक औषधसाठ्यासह पाठवल्या जाणार आहेत. तसेच सेवा, सुविधां विषयी नियोजनासाठी वारकरी प्रमुख (दिंडी प्रमुख) व सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, यांची समन्वय बैठक झाली. यात आवश्यक सेवा सर्वांना मिळावी, पंढपुरात पोहोचल्यावर पथकास जागा उपलब्ध करुन द्यावी, प्रवासात आवश्यक तपासण्या, उपचार, प्रथमोपचार, मिळतील, मात्र, यावर्षी सलाईन सुविधा मिळावी अशी मागणी करण्यात आली. या बैठकीला कणकवली, वैभववाडी, माणगाव, आबेगाव, सांगेली, मळेवाडी, तेर्से, बांबार्डे, निळेली येथील दिंडीप्रमुख उपस्थित होते. खासगी वाहनांसह वारकर्‍यांच्या सुमारे 84 बसेस पंढरपुरास जातात, असे वारकर्‍यांमार्फत सांगण्यात आले. ते म्हणाले 45 टक्के जनता माघी वारी करतात. वारकर्‍यांना पथकामार्फत प्रवासात व पंढरपूरात सेवा दिल्या जातील. दिंड्या मागेपुढे असल्याने अत्यावश्यक प्रसंगी फोन करावा. यासाठी दिंडी प्रमुखांना पथकातील अधिकारी यांचे फोन क्रमांक देण्यात येणार आहे.