Breaking News

सागरी सुरक्षा रक्षकांचे रखडलेले मानधन 2 दिवसात जमा होणार

सिंधुदुर्गनगरी, दि. 12, जानेवारी - राज्यात कोकण किनारपट्टीवर नेमण्यात आलेले सागरी सुरक्षा रक्षक गेल्या सात महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांची कु टुंबे आर्थिक अडचणीत आली आहेत. दरम्यान सागरी सुरक्षा रक्षकांचे रखडलेले मानधन 2 दिवसात त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय अधिकारी श्रीकांत वारुंजीकर यांनी दिली. 

मुंबईवर झालेल्या 26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही जबाबदारी मत्स्यव्यवयसाय विभागावर सोपवण्यात आली. या विभागाने राज्याच्या पश्‍चिम किनारपट्टीवर संवेदनशील 291 लँडींग पॉइंटवर सागरी सुरक्षा रक्षक नेमले. परंतु, मागील सहा महिन्यांपासून या सुरक्षा रक्षकांना पगारच मिळालेला नाही. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर 261 सुरक्षा रक्षक आणि 20 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे तब्बल 3 कोटी 47 लाख रुपये वेतनापोटी थक ीत आहेत. श्रीकांत वारुंजीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार 7 महिन्यापैकी केवळ 3 महिन्यांचे मानधन मत्स्यव्यवसाय विभागाकडे जमा झाले आहे. परंतु उर्वरित महिन्यांचे मानधन कधीपर्यंत सागरी सुरक्षा रक्षकांना मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. आजपर्यंतच्या दहशतवादी कारवायांचा इतिहास पाहता किनारपट्टीची सुरक्षा किती महत्वाची आहे, हे शासनास माहिती असूनही उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या सागरी सुरक्षा रक्षकांचे रखडलेल्या महिन्यांचे पूर्ण मानधन देण्यात एवढा वेळकाढूपणा का होत आहे? असा सवाल स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केला जात आहे.