विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार
स्मशानभूमीत त्यांचे पुत्र प्रबोध आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विधिवत त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. यावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. दरम्यान आज सकाळी स्व. वसंतराव डावखरे यांचे पार्थिव मुंबईहून ठाण्यातील हरिनिवास भागातील गिरीराज हाईट्स येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पुष्पवाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेक राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते, ठाण्यातील आमदार, लोकप्रतिनिधी यांनी एकच गर्दी केली होती. यानंतर त्यांची अंत्ययात्रा प्रमुख मार्गावरून निघून स्मशानभूमीत पोहचली.स्मशानभूमीत उपस्थित मान्यवर व नेत्यांनी स्व. डावखरे यांच्याविषयीच्या आठवणीला उजाळा दिला तसेच आपल्या भावना व्यक्त केल्या.
