Breaking News

नगर - पुणे महामार्गावर मरण स्वस्त अन् प्रवास महाग रोड अपघाताने ओलांडली शंभरी

पारनेर / प्रतिनिधी :- रस्ते ही विकासाची रक्तवाहिनी असते. ती निरोगी राहिली तर प्रवास सुखाचा होतो, अन् प्रवाशी सुखरूप राहतो. परंतु पारनेर, श्रीगोंदा तालुक्याच्या सरहद्दिवर असणार्‍या व नगर - पुणे महामार्गालगत असणार्‍या मुख्य रस्त्यांची वाहिनी पुरती खराब झाली असल्याने या रस्त्यावर मरण स्वस्त अन् प्रवास महाग झाला आहे.


सुपा, बेलवंडी पोलिस स्टेशनच्या 2016 ते 2017 या सालातील नोंदीनुसार महामार्गावरिल बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा, गव्हाणवाडी ते सुपा (महामार्ग) या रस्त्यावर अपघाताने शंभरी ओलांडत त्यात 75 नागरिक जखमी झाले तर 51 जणांचा मूत्यू झाला. यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक अपघात खड्ड्यांमुळे व अतिवेगामुळे झाले आहेत . 
महामार्गावर अपघात होत असतानाच महामार्ग अंतर्गत रस्त्यावरील वेगवेगळ्या मार्गावर 1 महिन्यात चार अपघातांनी 4 जणांचा बळी घेतला. हे सारे घडत असताना त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून करावयाची उपाययोजना बांधकाम विभागाच्या फाईलीतच राहत असल्याने सामाजिक संघटनानी चिंता व्यक्त केली. संकटातून शहाणपण जाणले तर संकटाचा सामना सदोदित करावा लागत नाही; परंतु संकटाला सहज घेतले तर ते पुन्हा कुण्या निष्पापाचा गळा घोटते. याची कैकदा प्रचिती येऊनही अद्यापपर्यंत शासन व्यवस्थेने शहाणपण जाणले नसल्याची खंत अपघात ग्रस्त नातेवाईकांनी व्यक्त केली.