Breaking News

भाजपामध्ये बूथप्रमुख हे अत्यंत महत्वाचे दुवे: प्रा. राम शिंदे


कर्जत/प्रतिनिधी/-भाजपामध्ये बूथप्रमुख हे अत्यंत महत्वाचे दुवे असून शासन सर्वसामान्याच्या हिताचे निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांनी जनतेशी कसे बोलले पाहिजे याचे अत्यंत सुंदर बौद्धिक जलसंधारण मंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथील बूथप्रमुखाच्या प्रशिक्षणात घेतले.

पं. दिनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजनेत महाविस्तार अभियान अंतर्गत मंगळवारी कर्जत येथे भाजपाने तालुक्यात नियुक्त केलेल्या २१० बूथ प्रमुखाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष अशोकराव खेडकर हे होते. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष भानुदास बेरड यांनी पक्षातील कार्यविस्ताराच्या कार्यात अहमदनगर जिल्हा राज्यात सर्वात अग्रेसर असून यामध्ये कर्जत तालुक्याचे काम आघाडीवर असल्याचे म्हटले. बूथ प्रमुखांनी आपल्या बूथवरील मतदार यादीतील प्रत्येक पानाचे अध्यक्ष नियुक्त करायचे असून तालुक्यातील नगरसेवक सरपंच वा मंत्री यांना सुद्धा त्या त्या पानावर अध्यक्ष नियुक्त करायचे असल्याचे म्हटले. 


 कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राउत, कर्जत भाजपा तालुकाअध्यक्ष अशोक खेडकर याचे सह यावेळी अनेकांची भाषणे झाली. तर पक्षाच्या विस्ताराची सविस्तर माहिती विस्तारक केशव दवंगे, मुख्यमंत्री वॉररूमचे प्रतिनिधी राहुल लांडे यांनी दिली. या शिबिरासाठी तालुक्यातील जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके, बापु शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधरतात्या पवार, उपसभापती प्रकाश शिंदे, अल्लाउद्दीन काझी, डॉ रमेश झरकर, बापूराव ढवळे, स्वप्नील देसाई, औदुबर निंबाळकर, बाबासाहेब गांगर्डे, युवा मोर्चा ता. अध्यक्ष शिवकुमार सायकर, रामदास हजारे, गणेश पालवे, विनोद दळवी, डॉ पंढरीनाथ गोरे, अनिल गदादे, यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व बुथ प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरचिटणीस अंगद रूपनर व उमेश जेवरे यांनी केले. 

यावेळी जलसंधारण मंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित बूथप्रमुखाचे प्रबोधन करताना शासनाच्या वतीने सुरु असलेले विविध योजनांची माहिती देताना सर्वसामन्य वंचित घटकाला न्याय देण्यासाठी काम केले जात असून ते आपण सर्वापर्यत पोहचवले पाहिजे. याशिवाय इतर अनेक मोठे निर्णय ही घेतले जात असून तालुक्यात विविध गावात आपण निधी दिला असून त्या गावच्या प्रमुखांच्या हवाल्याने याची माहिती दिली. बूथ प्रमुख हा अत्यंत मह्त्वाची भूमिका बजावत असतो त्याने सकारात्मक काम केले पाहिजे. असे सांगताना पक्षात सामुहिक निर्णय होतात त्यातून सर्वांना न्याय मिळत असतो त्याची काही वेळा प्रतीक्षा ही करावी लागते प्रवाहात रहावे लागते व आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावे लागते असा मोलाचा मंत्र ना. शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.