Breaking News

मुंबईत एलईडी लाईटद्वारे मासेमारी करणारी बोट जप्त


मुंबई, दि. 12, जानेवारी - एलईडी लाईटच्या सहाय्याने होणार्‍या मासेमारीला आळा घालण्यासाठी मुंबई (शहर व उपनगर), रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात मस्य व्यवसाय विभागाकडून विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई (शहर व उपनगर) जिल्हा अंमलबजावणी पथकाने केलेल्या कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री असलेली एक मासेमारी बोट जप्त करण्यात आली असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

एलईडी लाईटद्वारे करण्यात येणारी मासेमारी ही मत्स्य साठ्यावर अत्यंत घातक परिणाम करणारी आहे. केंद्र शासनाच्या 10नोव्हेंबर 2017 च्या आदेशानुसार एलईडी लाईटद्वारे मासेमारी करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. एलईडी लाईटच्या प्रकाशामुळे मासेमारी क्षेत्रातील सर्व मासे आकर्षित होऊन एकाच ठिकाणी जमा होतात. हा संपूर्ण साठा एक ाच जाळ्याद्वारे पकडला जातो. त्यामुळे असे साठे संपत गेल्यास भविष्यात माशांचे उत्पादन कमी होऊन मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते.