जिल्ह्यात 9 हजार 719 मतदारांची वाढ
सिंधुदुर्गनगरी, - 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी कार्यक्रम सध्या सुरु असून यामध्ये जिल्ह्यात 9 हजार 719 मतदारांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी 6 लाख 43 हजार एकूण मतदार होते. आता 6 लाख 52 हजार 719 मतदारांची संख्या निश्चित झाली आहे. पुढील महिन्यात 10 तारीख रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहीती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण खाडे यानी दिली.
लोकसभा व विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुका 2019 मध्ये होणार आहेत. या निवडणुकीमध्ये अचूक मतदार यादीच्या दृष्टीने मतदार यादी अद्यावतीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी मतदार कार्यक्रम राबविण्यात आला. मतदार यादीतील स्थलांतरित मतदार, मयत मतदार, व दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे वगळण्याची मोहीमही राबविण्यात आली.यामध्ये एकूण 10 हजार मतदार विविध कारणास्तव वगळण्यात आले. 19 हजार 719 मतदारांची नव्याने वाढ झाली. परंतु एकूण मतदारांच्या यादीत 10 हजार मतदार वगळले गेल्याने आता 9 हजार 719 मतदारांची वाढ झाल्याचे निश्चित झाले आहे.
मतदार यादीतील नाव दुरुस्ती किंवा अन्य दुरुस्ती साठी मतदार अॅप विकसित केले आहे. मतदाराना निवडणूक ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. यासाठी मतदारानी तहसीलदार कार्यालयात फोटो जमा करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण खाडे यानी केले आहे.