Breaking News

येवला मतदार संघात 8 कोटी 31 लाखांच्या रस्त्यांची कामे मंजूर

येवला, दि. 25, जानेवारी - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून येवला मतदारसंघात आ.छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून 8 कोटी 31 लाख रुपयांच्या रस्त्यांची कामे मंजूर झाली असून लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे. राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणार्‍या रस्त्यांच्या संख्येत लवाढ करण्यासह सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक असल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्याधर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविली जात आहे. 


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून येवला मतदार संघात मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये खालील कामांचा समावेश आहे. राज्य महामार्ग 25 पाटोदा ते रेपाळे आडगांव एकूण 10.60किमी रस्त्यासाठी 5 कोटी 78 लक्ष तर भाटगाव ते बोराडेवस्ती रस्ता एकूण 4.74 किमी रस्त्यासाठी 2 कोटी 52 लक्ष रुपये निधीस शासनाची मंजुरी आहे. सदर रस्त्यांची पुढील 5 वर्ष नियमित देखभाल करण्यात येणार असून त्यासाठी 38 लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

येवला मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सदर रस्त्याच्या कामासाठी ग्रामसडक योजनेतून निधी मिळण्याकरिता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार एकूण 15.34 किमी लांबीच्या 2 रस्त्यांसाठी 8 कोटी 31 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येवला मतदारसंघातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरवात होणार असल्याची माहिती लोखंडे यांनी दिली आहे.