Breaking News

महापालिका ठेकेदार, पुरवठादारांची बिले 23 मार्चपर्यंतच स्वीकारणार

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ठेकेदारांनी, पुरवठादारांनी केलेल्या कामांचे देयके (बील) तयार करुन उपअभियंता किंवा कनिष्ठ अभियंत्यानी ती तपासणीकामी लेखा विभागाकडे वेळेवर पाठवावीत. चालू आर्थिक वर्ष संपण्यापुर्वी सर्व प्रकारची बिले 23 मार्चपर्यंत लेखा विभागाकडे पोहोचलीच पाहिजेत. 23 मार्चनंतर आलेली बिले कदापी स्वीकारली जाणार नाहीत, असा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे महापालिकेतील ठेकेदार - पुरवठादारांबरोबरच अधिका-यांची धांदल उडाली आहे. 


सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांची बिले मार्चअखेरपर्यंत चुकती केली जाणार आहेत. दरम्यान, गतवर्षी 31 मार्चनंतर ठेकेदारांची बिले स्वीकारली गेली नव्हती. परंतु, सत्ताधा-यांनी ठेकेदारांची बिले अडवून पठाणी वसूली केल्याचा आरोप विरोधकांकडून केला होता. तसेच याबाबतची तक्रार पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर देखील केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा प्रशासनाने दोन महिने अगोदरपासूनच दक्षता घेतली आहे.महापालिकेच्या विविध विभागामार्फत शहरात विकासाची कामे केली जातात. ठेकेदार - पुरवठादारांनी केलेल्या कामांची बिले वेळेवर काढण्याची जबाबदारी लेखा विभागावर आहे. बील तयार करण्यापूर्वी उपअभियंता किंवा कनिष्ठ अभियंता, लेखाधिकारी यांनी ही बिले लेखा विभागात तपासणीकामी पाठविणे आवश्यक असते. मात्र, वेळोवेळी सूचना देऊनही त्याचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. त्यामुळे तेच तेच आक्षेप पुन्हा उपस्थित होऊन लेखा विभागाकडून बिले परत पाठविली जातात. 

गेल्या आर्थिक वर्षातील सुमारे 160 कोटी रुपयांची बिले लेखा विभागाने रोखून धरली. त्यावर पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी झाल्या. बिले काढण्याच्या मोबदल्यात भाजप पदाधिका-यांनी टक्केवारी घेतल्याचे आरोप झाले. या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 7 जून 2017 रोजी महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या. मात्र, त्याकडेही काणाडोळा करण्यात आला. अखेरीस आर्थिक वर्ष संपण्याच्या दोन महिने अगोदरच आयुक्तांनी याच सूचना पुन्हा परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. प्रत्येक बिलासोबत ठेकेदारांनी त्या कामावर नियुक्त केलेल्या कर्मचा-यांची यादी आणि त्यांचा ’पीएफ’ भरणा केल्याची चलने फाईलमध्ये समाविष्ट केल्यानंतरच उपअभियंत्याने बील देण्याची शिफारस करावी. ’पीएफ’चा भरणा केला नसल्यास बील पूर्ततेसाठी पाठवू नये.