Breaking News

कांद्याच्या दरात दोन दिवसात 1,200 रुपयांनी घसरण

लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याच्या दरामध्ये पुन्हा 300 रुपयांची घसरण दिसून आली. दोन दिवसांमध्ये कांद्याच्या दरात 1200 रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

लासलगाव बाजार समिती सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, आज लाल कांद्याला सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला. मोठ्या प्रमाणात नवीन कांदा हा गुजरात, मध्यप्रदेश इतर राज्यातील बाजारात येण्यास सुरुवात झाल्याने आवकमध्ये वाढ झाली आहे.तसेच देशात मागणीच्या तुलनेने पुरवठा वाढला आहे. तर, दुसरीकडे कांद्यावरील निर्यातमूल्य दर हे 700 डॉलर असल्याने देशातील निर्यातीला फटका बसला आहे.याच कारणामुळे कांदा दरात मोठी घसरण सुरु आहे आणि शेतकर्‍यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे.
मागील दोन वर्षानंतर कांद्याला समाधानकारक भाव मिळत होता. 

मात्र, शहरी भागात कांद्याने साठ रुपये किलोचा दर ओलंडल्याने तात्काळ सरकारने हस्तक्षेप करत निर्यातमूल्यात वाढ करुन अघोषित निर्यातबंदी केल्याची ओरड शेतकर्‍यांकडून केली जात आहे. आता तरी शासनाने किमान निर्यात मूल्य दर 700 डॉलर वरुण शून्य करावे अशी मागणी होत आहे. आज येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची 600 नगांची आवक होऊन लाल कांद्याला कमीत कमी 950 सरासरी 1650 तर जास्तीत जास्त 1905 भाव होते. 23 जानेवारी - सरासरी भाव -2900, 30 जानेवारी - सरासरी भाव -1951, 31 जानेवारी - सरासरी भाव -1650 लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज 2 लाख ते अडीच लाख क्विंटलची आवक होत आहे. तर पुणे व गुजरात राज्यातून कांद्याची मोठी आवक येत आहे.त्यामुळे नाशिकमधून मागणी कमी झाल्याने ही घसरण होत आहे.