Breaking News

22 जणांना आत्मदहनापासून परावृत्त करण्यास पोलिसांना यश

सातारा : स्वतंत्र्य दिन आणि प्रजासत्तादिन म्हटलं की, जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी व तहसिलदार कार्यालयासमोर आत्मदहन, अमरण उपोषण करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यंदाचा प्रजासत्ताक दिन आंदोलनाशिवाय झाला. सातारा जिल्ह्यातील 22 जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी समन्वयकाची भूमिका बजावत चांगल्या प्रकारे पोलिसिंग केल्यामुळे एकाही आंदोलकाने आपला जीव धोक्यात न घातला आपल्या कुटुंबियांच्या काळजी घेण्याचा निर्णय घेतला. 


स्वतंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा देणार्‍या आंदोलकांची संख्या वाढत चालली आहे. या दिवशी मंत्री, पालकमंत्री तसेच राजकीय नेते हजर असतात. आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत लक्ष वेधून घेण्यासाठी हा दिवस अनेकजण निवडतात.महिनाभरापासून विविध विभागामध्ये प्रजासलाकदिनी आंदोलन करणार, अशा इशार्‍यांचे निवेदन अनेकजण देतात. ऐका बाजूला प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना दुसरीकडे मात्र, पोलिसांना आत्मदहन करणार्‍या लोकांवर लक्ष ठेवावे लागते. पोलिसांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तैनात ठेवावा लागतो. दरवर्षी कोणी ना कोणी आत्मदहन आणि आंदोलन करतच असते. परंतू यंदाचा प्रजासत्ताक दिन या सार्‍या गोष्टीला अपवाद ठरला आहे.

सातारा जिल्ह्यातील 22 जणांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. पोलिसांच्या गोपनीय विभागाने या सार्‍या लोकांना भेटून त्यांचे मत परिवर्तन केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या मागण्यासंदर्भात ज्या त्या अधिकार्‍यांना त्यांना भेटवून समाधानकारक तोडगा काढला. त्यामुळे अनेकांनी आत्मदहन करण्याचा निर्णय मागे घेतला. स्वत:च्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आपल्या कुटुंबाला वार्‍यावर सोडू नका, तुमचे काम परत केंव्हाही होईल, मात्र तुमचा जीव तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्ही यातून प्रयत्न केला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होणार. यातून तुमचा मूळ हेतू बाजूला राहून दुसरीच कटकट तुमच्या मागे लागण्यापेक्षा संयमाने प्रशासनाकडून काम करून घ्या, अशा प्रकारचे सल्ले पोलिसांच्या गोपनीय विभागाने आंदोलनकर्त्यांना दिले. हाच मुद्दा उत्कृष्ट पोलिसिंगसाठी महत्वाचा ठरला. जिल्ह्यातील सर्व आंदोलकांनी पोलिसांनी दिलेला सल्ला मानून स्वत: जीव धोक्यात न घालण्याचा निर्णय घेतला. शहर पोलीस ठाण्याचे नारायण सारंगकर तसेच गोपनिय विभागाचे अनिल पवार, राहुल खाडे, दीपक झोपळे आणि सचिन नवघणे या टीमने आंदोलनकर्त्यांना आत्मदहनापासून परावृत्त करण्याचे काम केले. आंदोलकांनी पोलिसांनी दिलेला सल्ला ऐकल्यामुळे पोलीस दलासह प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्यास मदत झाली.