पोलिसांनी उधळला नक्षल्यांचा डाव, 15 किलो स्फोटके निकामी
गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी पेरलेला भूसुरूंग, स्फोटके हुडकून पोलिसांनी निकामी केलीत. त्यामुळे मोठा अनर्थ टाळण्यात पोलिसांना यश आले आहे.यासंदर्भात हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार 5 जानेवारी रोजी सीआरपीएफ व जिल्हा पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना गट्टा पोलिस मदत केंद्राच्या पश्चिमेस 2 किलोमीटर अंतरावर जांभिया पुलाजवळ एक वायर आढळून आला.
पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाला याबाबत माहिती देऊन पाचारण केले. त्याठिकाणी स्फोटके असल्याचे बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या लक्षात आले. बरेच प्रयत्न केल्यानंतर ही स्फोटके काढण्यात त्यांना यश आले. सुमारे 15 किलो वजनाची ही स्फोटके नंतर नष्ट क रण्यात आलीत. गट्टा-हेडरी मार्गावरुनच सुरजागड लोहखनिज आणणारे ट्रक ये-जा करीत असतात. या परिसरात पोलिस तैनात असल्याने तेही ये-जा करीत असतात. त्यामुळे पोलिस व खनिज आणणार्या मंडळींचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा हेतू होता. परंतु जवानांनी नक्षल्यांचा प्रयत्न उधळून लावण्यात यश प्राप्त केले.
