Breaking News

बडोद्यात 15 फेब्रुवारीपासून अ.भा. मराठी साहित्य संमेलन

पुणे, दि. 31, जानेवारी - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केले जाणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे साहित्याचा महोत्सवच असतो. यावर्षी हा महोत्सव साजरा करण्याचा सन्मान पुण्यश्लोक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा नगरीस लाभला आहे. येथील मराठी वाङमय परिषद ही साहित्य महामंडळाची सुप्रतिष्ठित संलग्न साहित्यिक संस्था आहे. यापूर्वी 1909, 1921, 1934 यावर्षी हे संमेलन बडोद्याने आयोजित केले होते.


प्रदीर्घ कालावधीनंतर 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुन्हा एकवार या संस्कारनगरीत होत आहे. 15 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता राजमहल मुख्य प्रवेशद्वार येथे ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होईल. शुक्रवारी 16 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. 


दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत विंदा करंदिकर विचारपीठाचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गुर्जर साहित्यिक डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते होईल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा, मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

17 फेब्रुवारीला सकाळी 6 ते 8 या वेळेत शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. 18 फेब्रुवारीला सकाळी 6 ते 8 या वेळेत संगीत पहाट हा कार्यक्रम होणार आहे. तर, सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत चं. चि. मेहता सभागृहात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.