भारतात प्रत्येक दिवशी 50 जणांचा कर्करोगाने मृत्यू
नवी दिल्ली, दि. 25 - भारतात दरदिवशी 50 पेक्षा जास्त मुलांचा कर्करोगाने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती, ग्लोबल ऑनकोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून समोर आली आहे. विशेष म्हणजे मृत्यू पावणाी ही मुले एक महिना ते 14 वर्ष वयोगटातील आहेत.
कर्करोगाच्या उपाचाराचा महागडा खर्च आणि अत्याधुनिक उपचारांचा अभाव यामुळे कर्करोगाने भारतात लहान मुले दगावण्याचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विकसित देशांमध्ये कर्करोगांच्या उपचारांमध्ये प्रगती झाल्यामुळे तिथे 80 टक्क्यापेक्षा जास्त मुले कर्करोगामधून बरी होतात असे या अहवालात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय संस्थांमधील संशोधकांनी अभ्यास करुन हा अहवाल तयार केला आहे. यामध्ये टोरांटो विद्यापीठ, मुंबईचे टाटा मेमोरीयल सेंटरचा सहभाग होता. कर्करोग भारतात वेगाने फोफावत असून, लॅनसेटच्या 2014 च्या अहवालानुसार भारतात दरवर्षी 10 लाखापेक्षा जास्त कर्करोगाच्या नव्या रुग्णांवर उपचार होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पुढच्या दशकभरात 2025 पर्यंत भारतात कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढणार आहे. यामुळे कुटुंबांवरील आर्थिक खर्चाचा बोजा सुद्धा वाढणार आहे. आरोग्य मंत्रालयाने पुढच्या दहावर्षात कर्करोग, मधुमेह आणि ह्दयविकारामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी आरोग्य मंत्रालय विविध उपायोजना आखत आहे.