Breaking News

फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने केला 11 कोटींचा दंड वसूल


पुणे, दि. 27, जानेवारी - तिकीट न काढता रेल्वेने फुकट प्रवास करणा-यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई बडगा उगारला असून मध्य रेल्वेच्या एकट्या पुणे विभागातील मळवली, बारामती मिरज व मिरज-कोल्हापूर सेक्शनमधील फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने 11 कोटी 19 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2017 दरम्यान केलेल्या कारवाईत तब्बल दोन लाख 14 हजार प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातील विनातिकीट प्रवास करणा-या एक लाख 4 हजार प्रवाशांकडून पाच कोटी 86 लाख 73 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुणे ते लोणावळा दरम्यान सर्वाधिक प्रवासी हे विनातिकीट प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती कारवाईतून समोर आली आहे. दरम्यान, प्रवाशांनी योग्य तिकीट काढूनच प्रवास करावा व संभाव्य दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.