Breaking News

आयएनएस कलवरी हे मेक इन इंडियाचे उत्कृष्ट उदाहरण - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


भारतीय नौदलाच्या सेवेत आजपासून दाखल झालेली आयएनएस कलवरी ही पाणबुडी ‘मेक इन इंडिया’चे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद‌्गार काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयएनएस कलवरी पाणबुडीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम झाल्याचे सांगितले.
प्रधानमंत्री यांनी आज ‘आयएनएस कलवरी’चे मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा आणि नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, आजचा दिवस सव्वाशे कोटी भारतीयांसाठी गौरवाचा दिवस असून या ऐतिहासिक क्षणासाठी सर्व देशबांधवांचे अभिनंदन करतो. आयएनएस कलवरी म्हणजे “मेक इन इंडिया”चे उत्तम उदाहरण आहे. आयएनएस कलवरी पाणबुडी म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यातल्या वेगाने वाढणाऱ्या धोरणात्मक भागिदारीचे उत्तम उदाहरण आहे. आयएनएस कलवरीमुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी भर पडली आहे.

21 वे शतक हे आशियाई देशांचे शतक मानले जाते. या शतकात, विकासाचा मार्ग हिंदी महासागराद्वारेच असणार हे निश्चित असून त्यामुळेच राष्ट्रीय धोरणांमध्ये हिंदी महासागराला विशेष स्थान आहे. हिंदी महासागरात जागतिक धोरणात्मक आणि आर्थिक हिताबाबत भारत पूर्णत: सजग असून त्यामुळेच आधुनिक आणि बहुआयामी भारतीय नौदल, या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.