Breaking News

सर्वांना २४ तास वीज उपलब्ध व्हावी : राष्ट्रपती

सर्वांना २४ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असून नियत कालावधीमध्ये हे ध्येय पूर्ण करावे, अशी सूचना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी आज ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’ निमित्त आयोजित कार्यक्रमात केली.
‘वीज’ गरीब लोकांसाठी आर्थिक सुरक्षा कवचाचे काम करते. गरीब, शेतकरी, मजदूर आणि आदिवासी अथवा वंचिताच्या झोपडीमध्ये ऊर्जा प्रदान करण्याची शासनाची जबाबदारी आहे. ऊर्जा संवर्धन जीवनात बदलाचे माध्यम बनत चाललेले आहे. या दिशेने आणखी पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे श्री कोंविद म्हणाले.

मागील तीन वर्षांमध्ये भारत देश ‘पॉवर सरप्लस’ राष्ट्र झाले आहे. मात्र, यामध्येच समाधान मानून चालणार नाही, तर गरजा वाढत चाललेल्या आहेत, त्यानुसार विविध ऊर्जा निर्मितीही करणे गरजेचे आहे. औद्योगिकरणासाठी वीज तितकीच महत्वपूर्ण आहे, जेवढे शेतीसाठी पाणी यामध्ये कुठलाही समझोता करून चालणार नाही. त्यासाठी ऊर्जा संवर्धनासह सतत ऊर्जा मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकताही राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

सरकारद्वारे राबविण्यात येणा-या विविध उपाययोजनांद्वारे ऊर्जा बचत केली जात आहे. यासह शासनाद्वारे योग्य किमतीत एलईडी बल्बचे वितरण केले जात आहे, या प्रोत्साहामुळेही वीजेची बचत होत आहे, जे प्रशसंनीय कार्य असल्याचे, राष्ट्रपती म्हणाले.