Breaking News

श्रीगोंदा फॅक्टरी जवळील जोशी वस्तीला शासनाची नवीन महसूल गावाची मंजूरी

मूळ लिंपणगावात समाविष्ट असणाऱ्या श्रीगोंदा फॅक्टरी जवळील जोशी वस्ती या प्रस्तावित महसूली गावाला शासनाने मंजुरी दिली असून, ३० नोव्हेंबर २०१७ च्या राजपत्रात त्याला प्रसिद्धीही दिली आहे.अशी माहिती श्री . भालचंद्र सावंत यांनी दिली .

श्री. सावंत म्हणाले, मूळ लिंपणगावात समाविष्ट असलेल्या जोशी वस्ती या भागाला नवीन महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी सन २०१४ पासून कार्यवाही व प्रयत्न चालू होते . महाराष्ट्र जमीन महसुली अधिनियम १९६६ चे पोटकलम ४ (१) अन्वये राज्य शासनाच्या वतीने अहमदनगर चे अपर जिल्हाधिकारी श्री. भानुदास पालवे यांनी ७ नोव्हेंबर २०१७ रोजी अधिसूचना काढून जोशी वस्ती या प्रस्तावित गावाच्या तपशिलाची अनुसूची प्रसिध्द केली होती व २८ नोव्हेंबर २०१७ पर्यंत हरकती मागविल्या होत्या.परंतु एकही हरकत न आल्याने जोशी वस्ती महसूली गावाला मंजुरी देऊन , त्याला राजपत्रात प्रसिद्धी देण्यात आली आहे.

जोशी वस्ती या नवीन महसूली गावाच्या सीमा पूर्वेला रेल्वे लाईन व मढेवडगाव रस्ता, पश्चिमेला जंगलेवाडी शिव व ढोकराई मळा शीव, उत्तरेला मढेवडगाव व म्हातार पिंप्री शीव आणि दक्षिणेला जंगलेवाडी व उर्वरित लिंपणगाव शीव या प्रमाणे राहणार आहेत, या नवीन महसुली गावात घनवट वस्ती, चोर वस्ती, पूर्वेकडील जोशी वस्ती, ससाणे वस्ती, श्रीगोंदा कारखाना, कामगार कॉलनी, कुलथे नगर, गोपाळवाडी, जुनी बाजार पेठ दुकान लाईन, उजागरे वस्ती, मुख्य जोशी वस्ती, इंदिरा गांधी तंत्रनिकेतन ( माध्यमिक शाळा ), शेजूळ वस्ती व कांगळे वस्ती या भागांचा समावेश आहे.

भूमापन क्रमांक ५१ आणि ५२ या दोन गटाच्या सुमारे ४०० एकर क्षेत्रात जोशी वस्ती हे नवीन गाव राहणार आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे सहा हजार आहे.नवीन महसुली गावातील ग्रामस्थांच्यावतीने शासनाचे आभार मानून अभिनंदनाचा ठराव करण्यात आल्याची माहिती श्री. सावंत यांनी दिली.