Breaking News

जळगाव जि.प.कडून ‘झिरो पेन्डसी’ च्या आदेशाला केराची टोपली

जळगाव, दि. 22, डिसेंबर - राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदेत ‘झिरो पेन्डसी व डेली डिस्पोझल’ हा उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आहेत. 31 डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या कार्यालयात अंमलबजावणी करुन झिरो पेन्डसी झाली पाहिजे, असे आदेश दिले आहे. असे असताना जळगाव जि.प.चे दोन विभाग वगळता सर्वच विभागांनी या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. नाशिक विभागाचे उप आयुक्त बनकर यांनी जि.प.च्या सर्व विभागांची माहिती घेतली असता ही बाब समोर आली आहे. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


दरम्यान, झिरो पेन्डसी व डेली डिस्पोझल या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यालयातील अभिलेख अद्ययावत करणे, अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, अनावश्यक कागदपत्रांचे नाशिकरण करणे, कार्यालये आणि परिसर स्वच्छ करणे, कार्यालयीन कामकाजाच्या कार्यपद्धतीबद्दल कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण देणे, नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे, उत्तम फर्निचर आणि सोयी सुविधांनी युक्त कार्यालये निर्माण करणे, हा उद्देश ‘झिरो पेन्डसी व डेली डिस्पोझल’ पद्धत सुरु करण्याचे मागे आहे. हा उपक्रम 31 डिसेंबरपर्यंत जि.प.च्या कार्यालयात राबविण्यात येत असून पुढील टप्प्यात तालुका व गाव पातळीवर राबविण्यात येणार आहे.