Breaking News

कायदे मंडळ विश्वस्तांच्या शासकीय निवासावर कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळकेंचा ‘व्हाईट कॉलर’ दरोडा


सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांचा साबां भ्रष्टाचारावर लक्षवेधी हल्लाबोल ; मंत्र्यांचे गुळमुळीत गोलमाल सर्पराजही बनले गूढ!
नागपुर /विशेष प्रतिनिधी - कायदे मंडळ विश्वस्तांच्या खोल्यांमध्ये झालेल्या कामात अपहार करून कायदे तयार करणाऱ्या ट्रस्टींनाच बेकायदेशीर हात दाखविणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील दरोडेखोरांना ‘मोक्का’ लावा, अशी मागणी तुमसरचे आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी आपल्या लक्षवेधी भाषणात सभागृहाकडे केली. या भाषणाला साबां मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर सर्वपक्षीय विधीमंडळ सदस्यांनी तीव्र नाराजी दर्शवित संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. 

अजूनही साबां मंत्री भ्रष्ट कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना सांभाळून घेतांना मंत्रीपदाची प्रतिष्ठा पणाला लावीत असल्याबद्दल शर्मनाक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. एका बाजूला एका भ्रष्ट कार्यकारी अभियंत्यासाठी महाराष्ट्र विधीमंडळाची ऐतिहासिक ‘गरिमा’ मंत्र्यांसारखे संवैधानिक पदाधिकारी वेठीस धरीत असल्याचा आरोप होत असतांना या अपहाराविरूध्द सार्वत्रिक आवाज उठविणारे जनतेचे विश्वस्त आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या खोलीत निघालेला साप हा निव्वळ योगायोग नाही. यामागे षडयंत्र असल्याची शंकाही बोलून दाखवली जात आहे. या साप प्रकरणाचीही सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

भारतीय जनता पक्षाचे तुमसर मतदार संघातील आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी मंत्रालय ते आकाशवाणी आणि मनोरा आमदार निवासातील कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला. गेली सहा महीने या गैरव्यवहाराची चर्चा मुख्यमंत्री, साबां मंत्री, साबां प्रशासन आणि माध्यम पातळीवर सुरू होती. 

मात्र विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील, ना. धनंजय मुंडे आ. चरणभाऊ वाघमारे, विरेंद्र जगताप, विजय वडेट्टीवार यांच्यासह जवळपास विधीमंडळाच्या सर्वपक्षीय अर्धा शेकडा सदस्यांनी या चर्चेवर दोन्ही सभागृहात लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा अशा संवैधानिक आयुधांचा वापर करून सभागृहात या भ्रष्टाचाराविरूध्द हिवाळी अधिवेशनात आवाज उठविल्याने आठवडाभरापासून हे प्रकरण राज्यव्यापी झाले आहे.

शुक्रवारच्या कामकाजात हे प्रकरण खोदून काढणारे आ. चरणभाऊ वाघमारे यांनी लक्षवेधीचे औचित्य साधून शहर इलाखा साबां विभागाशी संबंधीत असलेल्या या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि सहकार्यांच्या सदोष कार्यपध्दीताचा पंचनामा करीत अपहाराचे नियोजन कसे पार पाडले, याचा लेखाजोखा मांडला.

या प्रकरणाचे गांभीर्य हे की, एरवी अन्य शासकीय इमारती, रस्ते , पूल अशा सार्वजनिक कामात अनियमितता, अपहार, गैरप्रकार यात हातखंडा असलेल्या साबां जातकुळीतील शहर इलाखा विभागातील या चर्चित अभियंत्यांनी थेट कायदे बनविणाऱ्या कायदेमंडळ विश्वस्तांना म्हणजे लोकप्रतिनिधींनाच हातचलाखी दाखवून शासनाच्या तिजोरीवर म्हणजे सामान्य जनतेच्या घामातून निर्माण झालेल्या निधीवर कोट्यावधीचा दरोडा टाकला आहे. म्हणून सभागृहाने या अपहाराविषयी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन या प्रतिष्ठीत शासकीय दरोडेखोरांवर भादंविप्रमाणे कारवाई व्हावी, अशी आ. चरणभाऊ वाघमारे यांची मागणी होती.

टेंडरपासून नोंदी-देयकांपर्यत सारे खोटे
आपल्या लक्षवेधीवर केलेल्या भाषणात आ. चरणभाऊ वाघमारे यांनी ना. चंद्रकांत दादा पाटील यांची शहर इलाखा साबां विभागाच्या या चतूर, चलाख अभियंत्यांनी नियोजनपुर्वक दिशाभूल केली आणि या दिशाभूलीला मंत्रीमहोदय बळी पडले, अशा आशयाची शंका उपस्थित केली. कायदेमंडळाच्या विश्वस्तांनाच या अभियंत्यांनी हातसफाईचा खेळ दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा स्पष्ट आरोप आ. वाघमारे यांनी केला.श हर इलाखाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी टेंडर, मोजमाप पुस्तिकेतील नोंदी, कार्योत्तर तपासणी बील मंजूरी, देयके अदा करणे या प्रत्येक पातळीवर खोटे दस्त तयार केले असून जुलै महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर हा अपहार दडपण्यासाठी या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या अभियंत्यांनी नियोजनबध्द कार्यप्रणाली राबविली. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊन सात दिवसात चौकशी अहवाल मागविल्यानंतर दोन दिवसात आ. सतिश पाटील यांच्या कक्षाचा स्लॅब कोसळला. तो अजित पवार यांनी सभागृहात आणला होता. हा स्लॅब या अभियंत्यांनी पाडल्याचा गंभीर आरोपही आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केला. दैनंदिन नोंदीही खोट्या असून कार्यकारी अभियंत्यांनी तपासणीदेखील केली नाही. इतकेच नाही तर दरसुचीप्रमाणे खरेदी न करता बाह्यदराने खरेदी केल्याचे नमूद करतांना दुकानदारांकडून तीन तीन कोरे कोटेशन मागवून त्यावर आपल्या इच्छेप्रमाणे दर लिहीले. वास्तविक एक लाखाच्या वरील खरेदीसाठी ई-टेंडरींग मागविणे बंधनकारक असतांना त्यालाही फाट्यावर मारण्यात आले.

संगनमतातून भ्रष्टाचार म्हणून मोक्का आवश्यक
आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या कक्षात ही हेराफेरी उघड झाली. अन्य आमदारांच्या कक्षातही असा प्रकार झाला असावा म्हणून माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहीतीवरून हे कांड चव्हाट्यावर आले. याबाबत सभागृहाला अवगत करतांना ते म्हणाले की, एकूण तीस आमदारांच्या खोल्यांमध्ये हा गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. यातील पहिल्या दहापैकी नऊ खोल्यांमध्ये काम न करताच देयके अदा झाली आहेत. अपहाराची मर्यादा ओलांडल्याचे गुपीत सांगतांना आमदार वाघमारे यांनी मुंबईतील प्रती चौ.फुट कामाचा दर १५०० याप्रमाणे ३३०चौ. फुटाच्या सुशोभीकरणासाठी जास्तीत जास्त पाच लाख रूपये खर्च अपेक्षित असताना या अभियंत्यांनी वीस ते अठ्ठावीस लाख रूपये खर्च दाखवून अदा केले आहेत. हा प्रकारा संगनमतातून झाला असून जनतेच्या कष्टाची कमाईचा अवमान आहे. म्हणून शासनाने या अभियंत्यावर एफआयआर दाखल करून मोक्का लावावा. किंवा गुन्हा दाखल करण्याची परवानगी आमदारांना द्यावी अशी मागणी केली.

ना. दादांचे गुळमुळीत गोलमाल
आ. चरणभाऊ वाघमारे आणि आ. विजय वडेट्टीवर यांच्या लक्षवेधीला उत्तर देतांना सार्वजनिक बांधकाममंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी नेहमीच्या शैलीत या मुद्याला गुळमुळीत गोलमाल करून मूळ मागणीला बगल दिली. या प्रकरणी दोन सहअभियंत्यांचे निलंबन तर कार्यकारी अभियांत्यांची बदली करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आमदारांना परवानगीची गरज कशासाठी? ते व्यक्तीगत गुन्हा दाखल करू शकतात, असे सांगून शासन गुन्हा दाखल करणार नाही, याचे संकेत दिले. मुंबई साबां व्यतिरिक्त फिरते साबां स्कॉडचे अधिक्षक अभियंता चामलवार सखोल चौकशी करीत असून त्यात दोषी आढळणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहाला दिले.

दरम्यान ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या या उत्तराने ना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले, ना विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये. उलट स्वपक्षाच्या आमदाराला मंत्री अशा पध्दतीने उत्तर देत असतील तर विरोधक आणि राज्याचे चांगभलं नक्की होणार, अशी उपहासात्मक चर्चा सभागृह आवारात सर्वपक्षीय सदस्यांमध्ये सुरू होती.

वाढदिवसाचा केक आणि सख्य संबंधाचे रहस्य
विभागप्रमुख आणि कर्मचारी वृंद यांत स्नेहसख्य असावे. कार्यारोग्यासाठी ते लाभप्रदच. पण राज्य पातळीवर कामाचा व्याप सांभाळणारा एखादा मंत्री दर्जाचा विभागप्रमुख एखाद्या कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या पदस्थाविषयी विशेष आस्था दर्शवित असेल तर त्याची चर्चा तर होणारच. ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचा केक कापण्याचा केबिन सोहळाही असाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे या छायाचित्रात दिसणारे मोजके चेहरे आणि काही दिवसातच या चेहऱ्यावर होणारे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, अधिवेशन काळात सन्माननीय सदस्यांनी पोटतिडकीने औचित्याच्या मुद्यावर केलेली चर्चा हे सारे पटत असूनही मंत्रीमहोदयांनी तितक्याच चाणाक्षपणे सभागृहाच्या भावनेकडे सहज दुर्लक्ष करणे या घडामोडी केक सोहळ्यातील आठवणींना उजाळ्या दिल्याशिवाय राहत नाहीत.

आमदार निवासातील साप आख्यान
नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी सन्माननीय लोकप्रतिनिधींसाठी दिलेल्या एका रूममध्ये गुरूवारच्या रात्री साक्षात सर्प राज प्रगट होणे आणि ती खोली आ. चरणभाऊ वाघमारे यांची असणे हा निव्वळ योगायोग मानायचा का, यावर उपराजधानीत आमदारांमध्ये वेगवेगळा सूर आहे. हा साप विषारी नव्हता. आमदार निवासालगत असलेल्या ओढ्याच्या ओलाव्यामुळे या ठिकाणी नेहमीच पण सर्प येतात, असा खुलासा प्रशासनाने दिल्याचे वृत्त एका स्थानिक हिंदी दैनिकाने दिले आहे. मात्र या उपरांत हा साप पकडणार्या व्यक्तीला सापाने दंश केल्यामुळे त्याला नागपुरच्या इंदिरा गांधी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तो साप विषारी होता, असे काही मंडळींचे म्हणणे आहे. ही चर्चा हे प्रकरण वेगळ्याच दिशेला नेत आहे. या चर्चेमुळे आ. वाघमारे साबांच्या भ्रष्टाचारावर आक्रमक झाले असतांना नेमका त्यांच्या खोलीत सापाचा वावर असणे या घटनेला काही लोक निव्वळ योगायोग मानायला तयार नाहीत. तर त्यांच्या दृष्टीने हे साबांतील काही मंडळींनी केलेले षडयंत्र असावे. एकूणच हे साप प्रकरण शहर इलाखाच्या भ्रष्टाचाराइतकेच गंभीर वळणावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने अघटित घडले नाही. जर तरच्या शंकेने अंगावर काटा उभा रहात असल्याची भावना अनेक सदस्यांनी या सर्प आख्यानावर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केली. सापाचे आगमन हा योगायोग असो नाहीतर कारस्थान या प्रकरणाची सखोल चौकशी ही पारदर्शकशतेच्या भवितव्यासाठी औचित्याची संधी ठरेल ही सदस्यांची भावना गैर नक्कीच नाही.

आमदारांची समिती नियुक्त करा : वडेट्टीवार
आमदारांच्या खोट्या सह्या करून, खोटे कागदपञ बनवून आमदाराच्या एका एका कक्षात कामे केल्याचे दाखवून तीस तीस लाखाची बीले काढण्याचा हा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल आणि निकोप चौकशी होण्यासाठी सर्वपक्षीय पाच ते सात आमदारांची समिती नियुक्त करा, अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

आमदार गुन्हा दाखल करतील..पण?
शहर इलाखा विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात फौजदारी दाखल करण्यासाठी आ. चरणभाऊ वाघमारे वारंवार सरकारकडे परवानगी मागतात. आमदारांना त्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज काय, हे ना. चंद्रकांत दादा पाटील यांचे उत्तर धादांत खोटे आणि दिशाभूल करून भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे आहे, असे घटनेच्या अभ्यासकांसह कायदे तज्ञांचे मत आहे. आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या व्यक्तीगत घराच्या बांधकामात फसवणूक झाली असती तर मंत्र्यांचा दावा योग्य आहे. हा अपहार झाला ती इमारत अशासकीय आहे. शासनाने आमदारानां ते घर दिले आहे. ही वास्तू शासकीय पैसा जनता आणि शासनाचा. म्हणजे मुळ मालक शासन आणि जनता आहे, शिवाय ज्यांनी हा अपहार घडवून आणला ते जनता आणि शासनाचे नोकर आहेत. आमदार शासन जनतेतील दुवा म्हणून विश्वस्ताचे काम करतो. सार्वजनिक बाब म्हणून परावानगी अनिवार्य ठरते. ही बाब चंद्रकांत पाटील यांना मंत्री म्हणून माहीत असायला हवी. माहीत असेलही तथापि वेळ मारून नेण्यासाठी मंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल केली, असे जाणकारांचे म्हणणे आहे.