Breaking News

‘वैद्यकीय संशोधन तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे कर्णबधीरपणावर आगामी काळात मात करता येईल


वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारक संशोधन होत असून तंत्रज्ञान क्षेत्रात देखील नवनवे शोध लागत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये कर्णबधीरपणावर बऱ्याच अंशी मात करणे शक्य होईल असा आपणास विश्वास वाटतो, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
प्रभादेवी येथील स्टिफन मुकबधीर विद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षाची सांगता आज राज्यपालांच्या उपस्थितीत रविंद्र नाट्यमंदिर येथे झाली त्या प्रसंगी ते बोलत होते.गेल्या सहा दशकांमध्ये स्टिफन विद्यालयाने अनेक मुकबधीर विद्यार्थ्यांना शिक्षण - प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करीत समाजाची सेवा केली आहे, या शब्दात संस्थेचा गौरव करताना मुकबधीर मुलांना शिक्षण देणाऱ्या अद्ययावत शिक्षण संस्था राज्याच्या सर्व जिल्ह्यात निर्माण व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुकबधीर मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षण देणारे उत्तम शिक्षक -प्रशिक्षक स्टिफन विद्यालयाने घडवावे तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य वर्धन अभ्यासक्रम राबवावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. राज्यपालांनी यावेळी आपल्या स्वेच्छा निधीतून स्टिफन विद्यालायाला दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली.