Breaking News

राहुल गांधी पप्पू नाहीत, ते परिपक्व नेते : खा. संजय राऊत


पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता 2014 सारखे पप्पू राहिलेले नसून त्यांच्यात अधिक परिपक्वता, आक्रमकता आली आहे. त्यांचे नेतृत्व पाहता ते नेता वाटत असल्याची भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. 

राऊत म्हणाले, 2014 च्या निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी लोक चॅनेल बदलत असत. मात्र आता तेच लोक त्यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत आहेत. पंतप्रधान आणि त्यांचे समर्थक वारंवार चहा विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला. असे निवडणुकीवेळी सांगत आहे. मात्र, हेच जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा यांचा प्रचार त्यांनी असा का केला नाही, असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपा सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असून सरकारने तीन हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. अशाप्रकारे जाहिरातींवर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावे असा सल्ला त्यांनी दिला. स्वातंत्र्यनंतर 23 वर्षांनी वडनगर येथे रेल्वे आली त्यामुळे त्यांनी चहा कधी विकला, असा प्रश्‍न राऊत यांनी उपस्थित केला. पंतप्रधान सांगतात वयाच्या 20 व्या वर्षानंतर देशसेवा करण्यास सुरुवात केली. असे अनेक नेते परिस्थितीचा सामना करून राजकारणात उच्च पदावर पोहोचले आहेत. 

म्हणून राजकारणात गरिबीचे भांडवल करू नये, असे राऊत यांनी सांगितले. नाना पटोले यांच्या भाजपा खासदारकीच्या राजीनाम्याबाबत राऊत म्हणाले की, पटोले यांचा राजीनामा म्हणजे सरकार विरोधातील उद्रेक असून ही विदर्भातून पडलेली ठिणगी आहे. पटोले यांनी कष्टकरी, शेतकरी आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी कणखर भूमिका घेतली. मात्र भाजपा मध्ये त्याचा भ्रमनिरास झाला.