परवेझ मुशर्रफ यांना जागतिक अतिरेक्यांच्या काळ्या यादीत टाकण्याची मागणी.
'जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नुकतेच 'लष्कर-ए-तोयबा' व 'जमात-उद-दावा' या कुख्यात अतिरेकी संघटनांचा म्होरक्या हाफिज सईद याच्या काळ्या कारवायांचे जाहीर समर्थन केले होते. त्यामुळे अमेरिकेने कार्यकारी आदेश-१३२२४ (ईओ) अंतर्गत त्यांचे नाव जागतिक अतिरेक्यांच्या यादीत टाकले पाहिजे,' असे वर्ल्ड बलूच वूमेन फोरमच्या अध्यक्षा नायला कादरी यांनी म्हटले आहे.
'मी 'लष्कर'चा मोठा समर्थक असून, 'जमात'चा मला मोठा पाठिंबा आहे,' असे मुशर्रफ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्या या विधानाचा दाखला देत कादरी यांनी त्यांना अतिरेक्यांच्या काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
'पाकच्या राष्ट्राध्यक्षपदी असताना मुशर्रफ यांनी शेकडो बलूच कार्यकर्त्यांची हत्या केली. ते आजही आमचा खात्मा करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी मानवतेविरोधात काम केले आहे. त्यांचे व अतिरेकी संघटनांचे साटेलोटे असण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्यांच्यातील संबंधांची पोलखोल झाली पाहिजे,' असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.