बीडमध्ये दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
बीड : कचारवाडी येथील शेतकरी रामकिसन केशवराव वनवे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात आत्महत्याचे सत्र सुरू आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, बोंडअळीचा प्रादुर्भाव, धान्याला भाव नसणे आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.
कचारवाडी येथील शेतकरी मिठू ऊर्फ रामकिसन केशवराव वनवे हेसुद्धा त्रस्त होते. त्यातून त्यांनी राहत्या घरी मृत्यूला कवटाळले. यामुळे वनवे यांचे घर उघड्यावर पडले. वनवे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
अंतापूरयेथील शेतकरी वैजीनाथ आश्रुबा गाडे यांनी शनिवारी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. कापसाची बिकट अवस्था, कर्जाचा बोजा, कुटुंबाचा खर्च आदी कारणांमुळे अस्वस्थ होते. त्यातच त्यांनी शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान स्वत:च्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.