अवैध धंद्यांची तुफान चलती ; पोलीस यंत्रणेविषयी आश्चर्य आणि संताप!
जिल्हा पोलिस अधिक्षक राजकुमार शर्मा यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे. या नंबरवर संपर्क साधून माहिती कळवा लगेचच कारवाई करण्यात येईल, असे आश्र्वासनही देण्यात आले होते. मात्र सदर मोबाईल नंबरवर संपर्क साधला अजिबात प्रतिसाद दिला जात नाही. हा मोबाईल नंबर नागरिकांची चेष्टा करण्यासाठी तर नाही ना, अशी चर्चा संगमनेर शहर आणि परिसरात होत आहे. येथील अवैध धंदे हे पोलिसांच्याच जीवावर सुरु आहेत. असे असताना जिल्हा पोलिस अधिक्षक हे नावापुरतेच राहिलेले दिसत आहे. यावर नक्की कारवाई कोण करणार, जुगार, मटका कोण बंद करणार, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नाही म्हणायला शहरात पोलिस निरीक्षकांनी दारुच्या केसेस करण्याचे काम सुरु केलेले आहे. मात्र बाकी सर्व अवैध धंदे जोरात सुरु आहेत. शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी हा संपूर्ण शहरातील अवैध धंदेचालकांकडून आणि वाळू तस्कारांकडून वर्गणी गोळा करुन पोलिस निरीक्षकांना देण्याचे काम जोरदार सुरु झाले आहे. संगमनेरच्या पोलिस निरीक्षकांनी अजूनपर्यंत कोणत्याही अवैध धंद्यावर कारवाईदेखील केलेली दिसत नाही. या पोलिस निरीक्षकांना गृहमंत्र्यांचा कृपार्शिर्वाद असल्याची चर्चा जोर धरत आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाचे पालनदेखील करत नाहीत. ते जनतेच्या कामासाठी नसून फक्त अवैध धंदेचालकांसाठीच आहेत की काय, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहराच्या पोलिस निरीक्षकांना शहराची पार्श्वभूमी समजलेली दिसत नाहीत. त्यामुळे येथील नागरिक पोलिस निरीक्षकांवर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.