Breaking News

वीजेची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये संताप

पालघर, दि. 01, डिसेंबर - विक्रमगड तालुक्याची निर्मिती होऊन आज 17 वर्षाचा काळ लोटला हा तालुका ग्रामीण आदिवासी असूनही या तालुक्याचा विस्तार पाहाता येथे वीजमंडळाचे आणखी एक कार्यालय कार्यान्वीत होण्याची आवश्यकता आहे. सध्यस्थितीत जे कार्यालय अस्तित्वात आहे त्यामध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने विजेची सेवा वरचेवर खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.


तालुक्यात मोठया प्रमाणावर वीजग्राहकांची संख्या असून ती वाढती आहे़ या तुलनेत इतर तालुक्यात तीन तीन सेक्शन कार्यालय आहेत. मात्र, विक्रमगडमध्ये अवघे एक कार्यालय असून त्यातही अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने वीज समस्या कायम आहे़ त्यातच विजेच्या चोरीचे प्रमाणही वाढलेले असल्याने 100 टक्के मध्ये 70 टक्के विजेचा लॉस महावितरण कं पनीला सोसावा लागत आहेत़. तालुका भौगोलिक दृष्ट्या चारी बाजुंनी 6 क़ि मी़ क्षेत्रफळ पसरलेले आहे़ त्यांस एकूण 140 क़ि मी़ ची उच्चदाबाची विद्युत वाहीनी व लघु दाब असलेल्या 440 की़मी ची वाहीनी आहे़. येथे एकच शाखा कार्यालय असल्यामुळे लाईन ब्रेक डाउन होणे, नवीन सर्विस कनेक्शन, ना-दुरुस्त मीटर बदलणे, मेन्टनेन्स, वीजचोरीस आळा घालणे सध्या असणार्‍या कर्मचार्यांना जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे या तालुक्यासाठी किमान आणखी एक सेक्शन कार्यालयाची गरज आहे़ तुर्तास जे कार्यालय कार्यान्वीत आहे तेही कर्मचारी संख्या अपुरी व अपुर्‍या जागेत आहे़. या कार्यालयात एकूण 11 कर्मचारी असून पैकी 5 ते 6 कर्मचारी हे नियमित आहेत़. उर्वरीत हे सतत गैरहजर, अगर आजारपण व वयोवृध्द झाल्याने ते पुर्वी प्रमाणे काम करण्यास सक्षम नाही़ असे चित्र आहे.

एकंदरीत या स्थितीमुळे सर्व तालुक्यांचा विजेच्या कामाचा बोजा हा 5/6 कर्मचारी वर्गावरच पडत असल्याने तक्रारीमध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे ग्राहकांना चांगली सेवा पुर विण्यास सध्याची व्यवस्था अपूरी असल्याचे वारंवार जाणवते. दरम्यान, तालुक्यातील 9 हजारापेक्षा अधिक वीज ग्राहक अधिकृत आहेत़. तर अनेकांच्या घरी मीटर बसविलेले असतांनाही त्यांना बिल अदा केले जात नाही. तसेच ज्यांना वीजबिल अदा केले जाते त्यांना युनिटपेक्षा जास्त वापराचे भरमसाठ आकड्यांचे वीजबील दिले जाते. तसेच मोठयाप्रमाणे तालुक्यात वीज चोरी होत असतांना त्यावर आळा घालण्यात महावितरण कमी पडत असल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले. वीजचोरी पकडण्याची मोहिम राबविल्यास व प्रत्येकाला मीटर सक्तीचे केल्यास महावितरणाचे नुकसान कमी होण्यास मदत होईल असे चित्र आहे. त्यामुळे महावितरण आपल्या दारी योजनेचा शुभारंभ करुन जास्तीत जास्त नवे मीटर अल्प दरात व सवलतीच्या दरात खेडयापाड्यातील लोकांना देण्याची मोहिम होती घेतली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी सांगितले.