Breaking News

संपादकीय - पुरोगामीत्व तरूणाईच्या हाती कितपत सुरक्षित?

गेल्या आठवड्यात एका राज्यस्तरीय वृत्तपञात दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण व्हावी अशी मागणी करणारे एका संघटनेचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर सोशल मिडीयावर उमटत असलेल्या प्रतिक्रीया कुठल्याही भारताचे राष्ट्रवाद मान्य करणार्या नागरीकाचे मन सुन्न करणार्या ठरल्या.या बातमीचा हवाला देऊन सोशल मिडीयावर सुरू झालेले ते प्रतिक्रीया युध्द भारताला कुठे घेऊन जाणार ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


विशेषतः या सोशल प्रतिक्रिया युध्दात तरूणांचा उत्साही सहभाग अधिक चिंताजनक आहे हे विसरता येणार नाही. आपण लोकशाही जगतो.या लोकशाहीला जगविण्याचे काम आपले आहे.हे काम जबाबदारीने पार पाडले गेले तर आपल्याला लोकशाही खर्या अर्थाने स्वच्छंदपणे जगता येईल ही मानसिकता आजच्या तरूणाईत कुठेच शिल्लक नाही असे या प्रतिक्रीया दर्शवित होत्या.आर्थात त्या परिस्थितीला आम्ही म्हणजे प्रसारमाध्यमेही या तरूणाई इतकेच जबाबदार आहोत हे प्रांजळपणे कबूल करताना कुठलाच कमीपणा नसावा.

आज अञ तञ सर्वञ सामाजिक परिस्थिती अतिशय भयानक वळणावर येऊन ठेपली आहे.या धोक्याच्या वळणावर या सामाजिक परिस्थितीला योग्य दिशा दाखवली नाही तर सामाजिक सलोख्याचा कडेलोट करणारा भयंकर अपघात अटळ आहे. या देशात निर्माण झालेली किंबहूना निर्माण केलेली परिस्थिती कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून चिघळवण्यात माध्यमांचा मोलाचा सहभाग आहे हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

लोकशाही आणि लोकशाही ज्या बुरूजावर उभी आहे तो सामाजिक ऐक्याचा बुरूज आधिक सक्षम करणारी तरूणाई एखाद्या सामाजिक विघटनवादी विचारासोबत प्रवाहीत होत असेल तर त्या विचारांचा प्रवाह अडवून समाज विधायक विचारांच्या मार्गावर तरूणाईला आणण्याचे काम प्रसार माध्यमांनी करायाला हवं .प्रत्यक्षात माध्यमांच्या व्यवसाईक स्पर्धेमुळे सनसनाटी निर्माण करून बाजारात खप वाढविण्याचा अट्टाहास माध्यमांना आपल्या जबाबदारीपासून दूर नेत असल्याचे दुर्दैवी चिञ दिसत आहे.

दुसर्या बाजूला लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणविणारी माध्यम कुठल्या तरी एका विचारांचा रतीब घालून कट्टरतावाद्यांच्या गोठ्यातील बैलासारखा घाणा ओढू लागल्याचेही चिञ लोकशाहीच्या मुळावर उठले आहे.ज्यांनी समाजाला दिशा द्यायची ,तरूणाईवर राष्ट्रवादाचे संस्कार रूजवायचे ते कट्टर विचारवाद्यांचे बटीक बनल्याने या देशाच्या भुमीवर तालीबानी विचारांचे पिक बहरायला वेळ लागणार नाही.

हा धोका वेळीच ध्यानात येऊन देखील आम्ही विचारवंत माध्यमं आमची जबाबदारी ओळखायला तयार नाही.आपला देश पुरोगामी विचारांचा आहे.आम्ही स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतो.पण त्या भुमिकेचे संवर्धन करताना बेजबाबदारपणा दाखवतो आणि मुळ वादाला मुठमाती देणार्या कट्टरवादाचे संगोपन संवर्धन समर्थन करून उदात्तीकरण करतो ,अशा या प्रवाहात पोहणार्या तरूणाईवर आपण कुठले संस्कार करीत आहोत याचेही भान आम्हाला नसते.मग आमचे पुरोगामीत्व,आमची धर्मनिरपेक्षता तरूणाईच्या हातात सुरक्षित कशी राहणार हाच खरा सवाल आहे.