Breaking News

साईसंस्थानच्या गुलाब विक्रीबंदी निर्णयामुळे बेरोजगारी शेकडो तरुणांचा उपोषणाचा इशारा


शिर्डी/प्रतिनिधी - अगोदरच गर्दी नसल्याने व परिसरात मोठी कारखानदारी नसल्याने बेरोजगारांच्या रोजगाराचा मोठा यक्षप्रश्न उभा राहिलेला आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने गुलाबाची फुले समाधी मंदिरात भक्तांना विकत देण्यास बंदी केली आहे. त्यामुळे शिर्डी शहरात जवळपास ३०० तरुणांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने या निर्णयाचा फेरविचार केला नाही तर उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा साईअर्पण गुलाब विक्रेता संघ या संघटनेच्यावतीने निवेदन देऊन देण्यात आला.
यात म्हटले आहे, की शिर्डी परिसरात व पंचक्रोषित गुलाब शेतीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना व फुल विक्री करणाऱ्या लोकांना रोजगार मिळाला आहे. त्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असतो. प्रामाणिकपणे कष्ट करून अनेक तरुण साईमंदिर परिसर व मंदिरालगत असलेल्या गेट परिसरात हे तरुण गुलाब फुलाची विक्री करतात. साईभक्त समाधीवर गुलाब पुष्प ठेवण्यासाठी खरेदी करीत असतात. या व्यवसायाने जवळपास ५०० शेतकरी त्यावर अवलंबून असलेले अडीच हजार लोक व गुलाबाची फुले विकणारी ३०० तरुण व त्यांच्यावर जवळपास अवलंबून असलेली हजार – बाराशे कुटुंबातील सदस्य अवलंबून आहेत.