Breaking News

एसआरएमच्या ’मित्रोत्सवा’ला माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी, दि. 25, डिसेंंबर - आजच्या विद्यार्थ्याच्या हुशारीच्या बुद्ध्यांकाबरोबरच त्यांचा भावनिक बुद्ध्यांक जपणं तेवढचं महत्वाचं आहे. त्यासाठी आजी-माजी विद्यार्थ्यांच्या विचारांच आदानप्रदान होणं गरजेच आहे, असं आग्रही मत कुडाळच्या संत राऊळ महाराज झालेल्या मित्रोत्सव या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी व्यक्त केलं. एसआरएमचे सर्व माजी विद्यार्थी रविवारी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. 


माजी विद्यार्थ्यांच्या या मित्रोत्सवाला मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी देखील धावती भेट दिली.
महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे विखुरलेले विद्यार्थी रविवारी मित्रोत्सव या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. या विद्यार्थ्यांचं स्वागत भैरव जोगेश्‍वरी मंडळाच्या ढोलपथकाने वीजतगाजत केलं. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर रेखाटलेल्या रांगोळ्या उत्सवी वातावरण अधोरेखित करत होत्या. प्रत्येक माजी विद्यार्थ्याची माहीती भरून घेऊन नोंद केली जात होती. 1984 पासून कॅमेराबद्ध केले विविध क्षण अनेक माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेज जीवनात घेऊन गेले.


या मेळाव्याचं उद्घाटन कमशिप्र मंडळाचे सहकार्यवाह अनंत वैद्य, प्राचार्य डॉ. डिसले, माजी विद्यार्थी प्रतिनिधी सौ. सुगंधा खेकरे-गावकर, अँड. निलांगी रांगणेकर आणि चंद्रशेखर बाईत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झालं. प्रा. अरूण मर्गज आणि प्राचार्य डॉ. डिसले यांनी या मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला.