Breaking News

नितीन आगे प्रकरणी गप्प का?

कल्याण : कोपर्डी प्रकरणाचा जो निकाल लागला त्याचं सर्वांनी स्वागत केलं, मी सुद्धा केलं. मात्र आनंद साजरा करणारे हे नितीन आगेच्या निकालानंतर गप्प का, असा सवाल ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांनी उपस्थित केला. ते कल्याणमध्ये बोलत होते. 


कोपर्डी प्रकरणात आरोपींना फाशी झाली, तर दुसरीकडे खैरलांजी आणि नितीन आगे प्रकरणात मात्र आरोपी निर्दोष सुटले, हा राज्य सरकारचा हलगर्जीपणा असून न्यायव्यवस्थेत जातीयवाद होतोय, असा गंभीर आरोप मुणगेकरांनी केला. कोपर्डी निकालाबाबत आनंद व्यक्त करणार्‍यांनी नितीन आगे प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले त्यावेळी त्यांनी चिंता, दु:ख का व्यक्त केली नाही. 

तसंच महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात दाद मागावी अशी मागणी त्यांनी का केली नाही, अशी विचारणा मुणगेकर यांनी केली. माझा फाशीच्या शिक्षेला विरोध असला, तरी बलात्कार करणार्‍यांना, मग ते कुठल्याही जातीचे असले तरी फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. 

पण एकीकडे कोपर्डीप्रकरणाचा निकाल इतक्या जलदगतीने लागला असताना बाकीच्या प्रकरणांचं काय? असा सवाल मुणगेकर यांनी उपस्थित केला. सरकारच्या गोहत्याबंदीच्या मुद्द्यावर टीका करताना, मला वाटेल तेव्हा शिवाजी पार्कमध्ये जाऊन बीफ खाईन, असं वक्तव्य त्यांनी केलं.