Breaking News

ओखी वादळाचे थैमान ! कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्र, गोव्याला धोका.

मुंबई/प्रतिनिधी : दक्षिण भारतात तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. वादळ आणि पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता हे वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आला.


केरळ आणि तामिळनाडूच्या किनार्‍यावर शुक्रवारी ओखी वादळाने धडक दिली. सुमारे 110 ते 120 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वार्‍यांनी किनारपट्टीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. या वादळाच्या दरम्यान अनेक मच्छिमार बेपत्ता झाले असून, तब्बल 218 मच्छिमारांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि नौसेनेला यश आले. दरम्यान, पुढची सूचना मिळेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कन्याकुमारीसह दक्षिण तामिळनाडूतल्या 5 जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या किनार्‍यावर आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे हे वादळ निर्माण झाले असून, त्याचा प्रवास आता पश्‍चिमेच्या दिशेने सुरु झाला आहे.


तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओखी या चक्रीवादळाने तामिळनाडू व केरळला जोरदार तडाखा दिला असून, त्यात 12 ठार तर एकूण तीस जण बेपत्ता झाले. अरबी समुद्रात शुक्रवारी बेपत्ता नागरिकांचे शोधकार्य नौदलाने सुरू केले असून, समुद्र खवळलेला आहे. वादळानंतर जोरदार पाऊस झाला आहे. दोन्ही राज्यांत पाऊस कोसळत असून आता हे वादळ लक्षद्वीपकडे सरकत आहे.चक्रीवादळ आणि पाऊस कोसळत असल्याने खरबरादारीचा उपाय म्हणून चेन्नई, मदुराईसह अनेक शहरांतल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.