Breaking News

’बेटी बचाव बेटी पढाओ’ साठी सुभाष जांगडा धावले नाशिक ते शिर्डी

नाशिक, दि. 03, डिसेंबर - ’बेटी बचाव बेटी पढाओ’ चा संदेश देण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सेक्रेटरी सुभाष जांगडा यांनी आज (दि.2 डिसेंबर) नाशिक ते शिर्डी हे 90 किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. आज सकाळी पहाटे 4 वाजता नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान येथून त्यांनी धावायला सुरुवात केली त्यानंतर दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ते एकूण 11 तास 30 मिनिटे सलग धावत शिर्डी येथे पोहचले. 


त्यानंतर त्यांनी श्री.साई बाबा यांचे दर्शन घेऊन समाजात मुलींना मानाचे स्थान मिळावे स्त्री भृण हत्या थांबावी, तसेच त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी साईचरणी साकडे घातले. त्यांच्या या उपक्रमासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष जयपाल शर्मा व वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड हे विशेष सहकार्य लाभले.

समाजातील विघातक प्रथांमुळे आज मुलीची संख्या कमी होत असून ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे मुलींची भृण अवस्थेत हत्या न होता. त्यांना जीवन जगण्याचा अधिकार मिळावा तसेच त्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी बेटी बचाव, बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी आज नाशिक ते शिर्डी धावलो असून यापुढीलही काळात यासाठी प्रयत्न सुरु राहतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

प्रारंभी त्यांचे सिन्नर, पांगरी व त्यानंतर शिर्डी येथील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. याठिकाणी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिर्डी येथे शिर्डी संस्थान चे ट्रस्टी सचिन तांबे यांनी स्वागत केले.